माजी लष्करप्रमुख जन. व्ही. के. सिंग आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सहकारी किरण बेदी यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले पाहिजे, असे मत भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केले आहे. किरण बेदी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावाला दुजोरा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉ. स्वामी यांनी वरील मत व्यक्त केले आहे.
या देशाचे नेतृत्व करणाऱ्या पात्र उमेदवाराच्या आपण शोधात आहोत, हा नेता देशाला स्थैर्य देणारा असेल. त्यामुळे बळकट आणि स्थिर सरकारसाठी आपला मोदी यांना पाठिंबा आहे, असे किरण बेदी यांनी ट्विट केले.
‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलन हे भाजपच्या विरोधात नव्हते, ते केवळ काँग्रेसच्या घोटाळ्यांच्या विरोधात होते. भाजप सरकारमध्ये नाही, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले. कोलगेट, टूजी, सीडब्ल्यूजी या घोटाळ्यांच्या विरोधात आंदोलन होते, ते सत्तारूढ पक्षाच्या विरोधातील आंदोलन होते, असेही त्या म्हणाल्या.
लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था झाली तर जनता कोणाकडे पाहणार, त्यामुळे मतदार या नात्याने आपले मत नरेंद्र मोदी यांनाच आहे. त्यामुळे काँग्रेसचा घोटाळ्यांचा कारभार पाहता भाजपा या दुसऱ्या देशव्यापी पक्षाचा पर्याय आहे, असेही बेदी म्हणाल्या.