मनमोहन वैद्य यांनी आरक्षणाविषयी केलेल्या विधानावरुन गदारोळ सुरु झाला असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. मनमोहन वैद्य यांनी धर्माच्या आधारे दिल्या जाणा-या आरक्षणावर विधान केले आहे. यावरुन वाद निर्माण करण्याची गरज नाही असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते दत्तात्रय होसबळे यांनी म्हटले आहे.

जयपूरमध्ये झालेल्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते मनमोहन वैद्य यांनी आरक्षणावर भाष्य केले होते. आरक्षणामुळे फुटीरतावाद वाढू शकतो. त्यामुळे एका ठराविक वेळेनंतर जातीवर आधारित आरक्षणाचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले होते. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हे विधान केल्याने विरोधकांनी संघ आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप आणि संघ हे गरीबविरोधी आणि दलितविरोधी असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली होती. तर बिहारप्रमाणेच उत्तरप्रदेशमध्येही भाजपला धूळ चारु अशी प्रतिक्रिया लालूप्रसाद यादव यांनी दिली आहे.

आरक्षणाविषयीच्या विधानावरुन वाद सुरु झाल्याचे लक्षात येताच संघ आणि स्वतः मनमोहन वैद्य यांनी स्पष्टीकरण दिले. ‘जेव्हापर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहणार असे मी म्हणालो. संघ नेहमीच आरक्षणाच्या बाजूने आहे’ असे मनमोहन वैद्य यांनी सांगितले. धर्माच्या आधारे दिल्या जाणा-या आरक्षणाला इतिहासाची पार्श्वभूमी नाही. अशा आरक्षणामुळे फुटिरतावादी विचारधारेला पाठबळ मिळेल. अशा आरक्षणाऐवजी शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे असे वैद्य यांनी स्पष्ट केले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते दत्तात्रय होसबाळे यांनीदेखील वैद्य यांच्या विरोध धर्माच्या आरक्षणाला असल्याचे सांगितले. यात वादग्रस्त असे काही नसल्याचे त्यांनी सांगितले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरसंघचालकांनी आरक्षणावर प्रतिक्रिया दिली होती. संरसंघचालकांचे हे विधान भाजपला महागात पडले होते. केंद्र सरकार आरक्षणविरोधी असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. आता पुन्हा एकदा संघाच्या नेत्याने आरक्षण विरोधी मत मांडल्याने भाजपची कोंडी झाली आहे.