नरेंद्र मोदी यांचे भाजपमधील वर्चस्व वाढू लागल्यापासून बाजूला फेकले गेलेले भाजपचे ज्येष्ठ नेते व संस्थापक सदस्य लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची पक्षाची सर्वोच्च निर्णय समिती असलेल्या संसदीय मंडळातूनही मंगळवारी उचलबांगडी करण्यात आली. या दोघांसह आजारी अटलबिहारी वाजपेयींना पक्षाच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य नेमण्यात आले आहे. तर पक्षाच्या संसदीय मंडळात शिवराजसिंह चौहान, जे. पी. नड्डा या नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला.
भाजपने मोदींना गेल्या वर्षी ९ जून रोजी प्रचारप्रमुख व पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यापासून ८६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी नाराज आहेत. पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देणे, संसदेत मागील बाकांवर बसणे अशा कृतींतून त्यांनी ही नाराजी अप्रत्यक्षपणे दाखवूनही दिली. मात्र, नरेंद्र मोदी यांनी त्याला फारसे महत्त्व दिले नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात ७५ वर्षांवरील नेत्यांना स्थान द्यायचे नाही हे मोदींचे धोरण होते. तेच धोरण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी संसदीय मंडळाच्या फेररचनेत राबवले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव गेले दशकभर सक्रिय राजकारणापासून दूर असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अडवाणी व जोशी यांना संसदीय मंडळातून हटवण्यात आले. या तिघांसह मोदी व राजनाथ सिंह यांचा समावेश असलेल्या प्रतिकात्मक मार्गदर्शक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
‘अडवाणी वृद्धाश्रमात’
भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना संसदीय मंडळातून हटवून ‘वृद्धाश्रमात्त पाठवण्यात आले आहे. पक्षाच्या ‘मार्गदर्शक मंडळा’त आता ते केवळ बघे उरले आहेत, अशी उपहासात्मक टीका काँग्रेसने केली. भाजपमध्ये सत्तेचे केंद्रीकरण होत असल्याचे या नव्या घडामोडींतून स्पष्ट दिसून येते, असे पक्षाने म्हटले आहे.
संसदीय मंडळ (१२ सदस्य) अध्यक्ष : अमित शहा, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, वेंकय्या नायडू, नितीन गडकरी, अनंत कुमार, थावरचंद गेहलोत, शिवराज सिंह चौहान, जे. पी. नड्डा व रामलाल * मार्गदर्शक मंडळ (पाच सदस्य) अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह.