देशभरात अनेक ठिकाणी विरोध, निषेधाचे सूर उमटत असतानाही असंख्य जोडपी, तरुण प्रेमी व इतरांनी शनिवारी ‘व्हॅलेण्टाइन डे’ साजरा केला. अनेक मॉल्स, हॉटेले, सिनेमागृहे व अन्यत्र आपापल्या अत्यंत प्रिय व्यक्तींच्या साथीने प्रेमीजनांनी हा दिवस उत्साहात साजरा केला.
परस्परांना भेटवस्तू देत, शुभेच्छांची देवाणघेवाण करून प्रेमी युगुलांनी  ‘व्हॅलेण्टाइन डे’ चे निमित्त साधून आपल्या प्रेमजीवनास नव्याने उजाळा दिला. हृदयाच्या आकाराचे, लाल व गुलाबी रंगाचे फुगे, त्याच आकाराची फुले अशा लक्षवेधी सजावटीने हॉटेले व रेस्टॉरण्ट्स भरून गेली होती. काही जणांनी तर आपल्या प्रियजनांसाठी आदल्या दिवसापासूनच हॉटेलमधील टेबले राखून ठेवली होती.
देशाच्या राजधानीत, दिल्लीत शनिवारचा माहोल काहीसा वेगळा होता आणि त्याचे कारण होते, अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीचे..अनेक तरुण-तरुणींनी केजरीवाल यांच्या शपथविधीस जाण्याचे ठरवून आपला दिवस जणू त्यांच्याच संगतीत घालविण्याचा निर्णय घेतला आणि अवघे रामलीला मैदान तरुणाईने जणू फुलून गेले.

युगुलांचा पाठलाग
कानपूर : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व्हॅलेंटाइन दिनी उद्याने व प्राणिसंग्रहालयात फिरायला गेलेल्या युगुलांचा पाठलाग केला. अनेक युगुले मोती हिल पार्क व प्राणिसंग्रहालयात जमले होते. दुपारी त्यांचा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केला. उद्यान व प्राणिसंग्रहालय कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. बजरंग दलाचे नेते नवीन कुमार यांनी सांगितले, की व्हॅलेंटाइन दिन सादरा करणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात असून त्यामुळे आम्ही निषेध केला. कार्यकर्त्यांनी मुलींशी गैरवर्तन न करता केवळ त्यांना घरी जाण्यास सांगितले. या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

उत्तर प्रदेशात हिंदू संघटनांचा विरोध
उत्तर प्रदेशात हिंदू संघटनांच्या अनेक कार्यकर्त्यांना व्हॅलेंटाइन दिनाचा कार्यक्रम उधळून लावण्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. या कार्यकर्त्यांनी तरुण युगुलांना लक्ष्य केले होते. हिंदू महासभेने असा दावा केला की, किमान ८०० युगुलांनी विवाहाचा प्रस्ताव नोंदवला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्व शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले होते.
सर्व मॉल, पार्क व चित्रपटगृहात जादा कुमक तैनात करण्यात आली होती. हिंदू महासभा, बजरंग दल, हिंदू dv03युवावाहिनी यांनी सार्वजनिक ठिकाणी फेरफटका मारून युगुलांना हुसकावण्याचा प्रयत्न केला, लखनौ, कानपूर, लखीमपूर खेरी, बुलंदशहर व बरेली येथील वृत्तानुसार या संघटनांच्या युवकांनी सार्वजनिक ठिकाणी व्हॅलेंटाइन दिन कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. १३-१४ युवकांना लखीमपूर खेरी येथे अटक करण्यात आली, असे पोलीस अधीक्षक अरविंद सेन यादव यांनी सांगितले. बरेली येथे हिंदू युवा वाहिनी व शिवसेनेच्या सहाजणांना संशयावरून ताब्यात घेतल्याचे पोलीस अधीक्षक राजीव मेहरोत्रा यांनी सांगितले. हिंदू महासभेने असे जाहीर केले की, सार्वजनिक ठिकाणी दिसणाऱ्या युवकांचा विवाह लावून दिला जाईल. काहींनी त्यांचे पत्ते व नावे आमच्याकडे दिली आहेत असे हिंदू महासभेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक यांनी सांगितले. राजधानीत ७००-८०० जोडप्यांनी आमचे म्हणणे मान्य करून प्रेम म्हणजे सार्वजनिक ठिकाणी करण्याची गोष्ट नव्हे हे मान्य केले असे ते म्हणाले. बुलंदशहर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोडप्यांना उठाबशा काढायला लावल्या. लखनौत बजरंग दलाने तीन मोर्चे काढून सार्वजनिक ठिकाणी जमलेल्या युगुलांना हुसकावले.