वाराणसी हे हिंदूंसाठी पवित्र तीर्थक्षेत्र. स्वाभाविकच परदेशातूनही येथे पर्यटकांचा राबता असतो. मात्र यंदा चित्र वेगळे आहे. या वेळी वाराणसी हे निवडणुकीचे ‘तीर्थक्षेत्र’ ठरले आहे. आणि देशात राजकीय ज्वर वाढत असताना वाराणसीत ‘निवडणूक पर्यटना’स चालना देण्याचा अभिनव उपक्रम एका अमेरिकास्थित नियंत्रकाने सुरू केला आहे. ‘जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशाच्या निवडणूक प्रक्रियेतील वातावरणाची पाहणी आणि निरीक्षण’ करण्याची संधी अमेरिकी पर्यटकांना दिली जात आहे.
‘भारतीय लोकशाहीच्या गाभाऱ्यात या पर्यटकांना आणणे आणि त्यांना या राजकीय ज्वराचे दर्शन घडविणे ही उत्तम संकल्पना आहे. विशेषत: अखंड भारत दर्शन झाल्यानंतर समारोपासाठी वाराणसीसारख्या तीर्थक्षेत्री येणे आणि राजकीय डोहातही स्नान करता येणे ही उत्साही पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते आहे’, अशी माहिती या उपक्रमाचे भारतातील समन्वयक आणि मार्गदर्शक सोम नाथ यांनी दिली. १८ अमेरिकी पर्यटकांची पहिली तुकडी नुकतीच ही वारी करून मायदेशी परतली असून येत्या २४ तारखेला आणखी एक चमू वाराणसीत येणार आहे.

निवडणुकीमुळे चालना
नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील लक्षवेधी लढतीमुळे येथील अर्थव्यवस्थेस चालना मिळाली आहे. येथील परिवहन उद्योग आणि हॉटेल व्यवसाय यंदा चांगलेच तेजीत आहेत. विमान वाहतुकीनेही चांगलाच जोर पकडल्याचे चित्र आहे, अशी माहिती वाराणसी पर्यटन संघाचे अध्यक्ष सुशील सिंह यांनी दिली.

मतदार जागृती
आपल्या वाराणसी भेटीत अमेरिकी पर्यटक पांढरीशुभ्र वस्त्रे आणि गांधी टोपी असा भारतीय पेहराव परिधान करीत असून, हातात फलक घेऊन ‘मतदार जागृती’देखील करीत आहेत. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे हे तर अलीकडे अमेरिकेसाठीही आव्हान ठरू लागले आहे, अशी प्रतिक्रिया ६७ वर्षीय सारा अल्सडॉर्फ यांनी व्यक्त केली.

परदेशी पर्टकांचा उच्चांक
यंदा गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत अवघ्या चार महिन्यांत सर्वाधिक परदेशी पर्यटक वाराणसीत येऊन गेले आहेत. २०१२ मध्ये येथे २२,४५५ परदेशी पर्यटक आले होते, तर २०१३ मध्ये हाच आकडा २४८९५ पर्यंत पोहोचला होता. २०१४ मध्ये एप्रिल महिनाही उलटायचा असतानाच येथे ४१५९२ परदेशी पर्यटकांची हजेरी लागली आहे.