राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनी आज अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभांरभ केला. या योजनेअंतर्गत ५ रुपयांत नाष्टा आणि ८ रुपयांत जेवण मिळणार आहे. ‘सबके लिए भोजन, सबके लिए सन्मान’, या उद्दिष्टासह सुरू झालेल्या या योजनेचा लाभ गरीब, मजूर, विद्यार्थी आणि वरिष्ठ नागरिकांसह सर्वांनाच होईल असे वसुंधरा राजे यांनी म्हटले.

एक दलित महिला आणि एका गुज्जर महिलेला आपल्या हाताने घास भरवून वसुंधरा राजे यांनी या योजनेचा शुभारंभ केला. बाजरीची भाकरी, लसणाची चटणी, बेसनच्या वड्यांची भाजी या भोजनाचा स्वाद वसुंधरा राजे यांनी किरण आणि कैलाशी गुज्जर या महिलांसोबत घेतल्याचे एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगण्यात आले.

वसुंधरा राजे यांच्यासोबत श्रीचंद कृपलानी आणि अशोक परनामी हे भाजप नेते होते. तसेच, महापौर अशोक लाहोटी यांनी देखील आपली उपस्थिती कार्यक्रमास लावली.

अन्नपूर्णा रसोई योजनेमध्ये जेवण पुरविण्यासाठी स्पेशल व्हॅन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या एकूण ८० व्हॅन ठिकठिकाणी जेवणाची व्यवस्था करतात. सध्या राज्यातील १२ जिल्ह्यांत ही योजना सुरू करण्यात आली आहे.

पुढील पंधरा दिवसात जयपूरला २५, झालवारला ६, जोधपूर, उदयपूर, अजमेर, कोटा, बिकानेर, भरतपूरला पाच व्हॅन मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुर्गापूर, बंसवाडाला चार-चार व्हॅन मिळतील तर, प्रतापगड आणि बारनला तीन-तीन व्हॅन मिळतील.

स्वयंपाक बनविण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असल्याची माहिती ही योजना राबविणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. व्हॅनच्या बाजूला बसण्यासाठी आसने देण्यात आली आहे त्याबरोबरच कर्मचाऱ्यांना गणवेश, अॅप्रन आणि ग्लोव्ज देण्यात आले आहेत. एक वेळच्या जेवणाच्या किंमत ही २३.७० रुपये आहे परंतु ग्राहकांनी केवळ ८ रुपये देणे अपेक्षित आहे तर, नाष्ट्याची किंमत २१.७० रुपये आहे परंतु ग्राहकांकडून ५ रुपये आकारले जातील. उर्वरित रक्कम ही शासनातर्फे अनुदान म्हणून देण्यात येईल.

उच्च न्यायालयाने गुज्जरांना आरक्षण नाकारले त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये गुज्जर आंदोलनाने पुन्हा जोर पकडला आहे. त्यांना शांत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी सरकारी अनुदान तत्वावर अम्मा कॅंटीन यशस्वीरित्या चालवली होती. २०१३ साली सुरू करण्यात आलेल्या या कॅंटीनमध्ये १ रुपयात नाष्टा आणि ५ रुपयांमध्ये जेवण देण्याची सोय करण्यात आली होती. त्याच धर्तीवर राजस्थान सरकारने अन्नपूर्णा रसोई योजना सुरू केली आहे.