व्ही.के.सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य

रोहित वेमुला हा माझा आदर्श आहे, असे वक्तव्य  करणाऱ्या कन्हैयाकुमावर व्ही. के.सिंह यांनी टीका केली आहे. मात्र मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी दिलेल्या याकूब मेमनसाठी रोहित वेमुला याने सभा आयोजित केली होती, असा आरोप केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह यांनी केला आहे.

दहशतवादाला प्रोत्साहन देण्याऱ्या व्यक्तींचा उदो उदो आम्ही करणार काय, असा सवाल सिंह यांनी भाजयुमो कार्यक्रमात विचारला. हैदराबादमधील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येवरून भाजप सरकारवर चौफर टीका होत असतानाच व्ही.के.सिंह यांच्या या विधानावरून वाद होण्याची चिन्हे आहेत. सरकारच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन सरकारची कामे सांगावीत तसेच राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले. नेपाळ, भूतान व म्यानमार या शेजारील देशांसोबत संबंध सुधारण्यात सरकारला यश आल्याचे परराष्ट्र राज्यमंत्री असलेल्या सिंह यांनी स्पष्ट केले.

मोदींच्या लोकप्रियतेमुळेच प्रत्येक देशाला मोदींनी आपल्या देशाला भेट द्यावी, असे वाटते असा दावाही सिंह यांनी केला.

शत्रुघ्न सिन्हांकडून कन्हैयाचे कौतुक

कारागृहातून सुटल्यानंतर कन्हैयाकुमारने केलेल्या भाषणाचे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी कौतुक केले आहे. सिन्हा हे भाजपवर नाराज आहेत. देशाविरुद्ध तो काही बोलला नाही तसेच तो बिहारचा असल्याने त्याच्या बाजूने बोलत असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले. कन्हैयाची आक्रमकता व त्याची देहबोली उत्तम होती असे सिन्हा म्हणाले. सिन्हा भाजप नेतृत्वावर नाराज आहेत. त्यामुळे कन्हैया प्रकरणातही त्यांनी विरोधात भूमिका घेतली आहे.