विमान सुटण्यास उशीर झाल्यामुळे सामान्य प्रवाशांना होणारा मनस्ताप यात काही नवे नाही. आता यामध्ये केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांची भर पडली आहे. मंगळवारी एअर इंडियाचे विमान सुटण्यास उशीर झाल्यामुळे नायडू यांना महत्त्वपूर्ण भेटीगाठी रद्द करून घरी परतावे लागले. या सगळ्यामुळे संतप्त झालेल्या नायडू यांनी ट्विटसच्या मालिकेतून एअर इंडियाच्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. नायडू यांना आज १ वाजून १५ मिनिटांच्या विमानाने हैदराबादला जायचे होते. त्यासाठी ते दिल्ली विमातळावर विमान सुटण्याच्या ४५ मिनिट आधी म्हणजे साडेबारा वाजताच दाखल झाले होते. मात्र, सव्वा वाजता वैमानिक न आल्यामुळे विमान सुटण्यास उशीर होईल, अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर नायडू यांनी तब्बल अर्धा तास वाट बघितली. मात्र, तेव्हादेखील प्रवाशांना विमानामध्ये चढून देण्यात आले नव्हते. या विलंबामुळे नायडू यांना हैदराबादमधील महत्त्वपूर्ण भेटीगाठी रद्द कराव्या लागल्या. यानंतर संतापलेल्या नायडू पुन्हा घराकडे मोर्चा वळवला. दरम्यान, नायडू यांनी विमानाला झालेल्या उशीराबद्दल एअर इंडियाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. पारदर्शकता आणि जबाबदारीने वागणे ही आजच्या काळाची गरज आहे, असेदेखील नायडू यांनी एअर इंडियाला सुनावले आहे. आपण स्पर्धेच्या युगात आहोत, ही गोष्ट एअर इंडियाने ध्यानात घेतली पाहिजे. विमानाला उशीर झाल्यामुळे माझी महत्त्वाची भेट चुकली, असे नायडू यांनी ट्विटसमध्ये म्हटले आहे.