नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार सगळ्या देशावर हिंदी भाषा लादत असल्याचा डीएमके नेते स्टालिन यांनी केलेल्या आरोपाला आज भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी उत्तर दिलं.

“हिंदी भाषा लादण्याचा प्रश्नच येत नाही. हिंदी ही एक उपयुक्त भाषा असून, ज्याला ती शिकायची आहे. त्याने ती शिकावी” असं व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं.

“केंद्र सरकारला भारताचं रूपांतर ‘हिंडिया’मध्ये करायचं आहे” असं स्टालिन यांनी त्यांच्या व्हिडिओ संदेशात म्हटलं होतं. हा व्हिडिओ संदेश त्यांच्या ऑफिसने शनिवारी रात्री प्रसारित केला.

“पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यावर त्यांनी अनेक प्रकारे हिंदी आणि संस्कृत भाषा लादण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे धोरण देशाची शांतता धोक्यात आणू शकतं” असं त्यांनी त्यांच्या व्हिडिओ संदेशात म्हटलं होतं.

‘ज्या खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना हिंदी येते त्यांनी हिंदीचा वापर आपली अधिकृत भाषा म्हणून करावा’ अशा स्वरूपाचा प्रस्ताव एका संसदीय समितीने आणला आहे. त्याविषयी स्टालिन त्यांच्या व्हिडिओ संदेशामध्ये बोलत होते. त्याचप्रमाणे सीबीएससीमध्ये आता हिंदीला सक्तीची भाषा करण्यात आलेलं आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.

हिंदीचा मु्द्दा हा दाक्षिणात्य राज्यांसाठी फार संवेदनशील तसाच राजकीय मुद्दा आहे. साठीच्या दशकामध्ये हिंदीविरोधी आंदोलनं या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यामुळे हिंदीचा प्रश्न तिकडच्या जनतेसाठी फार मोठा प्रश्न आहे.

जयललितांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. जयललितांनंतर त्यांच्या राईट हँड शशिकला ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत होत्या. पण त्यांना तुरूंगात जावं लागल्याने त्यांचे समर्थक ई पलानीस्वामी तामिळनाडूच्या मुख्यंमत्रीपदी बसले. पण शशिकलांचे विरोधक आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी शशिकलांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पोकळी भरून काढण्याच्या दृष्टीने त्यांनी हा संवेदनशील मुद्दा घेतला आहे का? अशी चर्चाच सुरू झाली आहे.