४.८३ अब्ज डॉलर्स मोजणार; वर्षभरात व्यवहार

इंटरनेट विश्वातील महत्त्वाची कंपनी असलेली ‘याहू’च्या विक्रीचा व्यवहार दृष्टिपथात आला आहे. अमेरिकेचीच व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स कंपनी ४.८३ अब्ज डॉलर्स मोजून ‘याहू’ खरेदी करणार आहे. त्याद्वारे डिजिटल जाहिरात आणि माध्यम व्यवसायात मोठी वाढ होण्याची आशा व्हेरिझॉन कम्युनिकेशन्सने व्यक्त केली आहे.

व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स कंपनीने गेल्या वर्षी ‘एओएल’ची ४.४ अब्ज डॉलर्सना खरेदी केली होती. ‘एओएल’च्या इंटरनेट व्यवसायाला चालना देण्यासाठी याहू उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी याहू आणि ‘एओएल’ यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स आणि याहू यांचा हा व्यवहार २०१७ च्या सुरुवातीला पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र या व्यवहारात याहूच्या अलिबाबा या चिनी ई-कॉमर्स कंपनीत असलेल्या समभागांचा समावेश नाही.

या व्यवहाराला समभागधारक आणि नियामक संस्थेची मंजुरी मिळेपर्यंत याहू ही स्वतंत्र कंपनी म्हणून कायम राहील, असे याहूच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेरिसा मेयर यांनी सांगितले. याहूमध्ये कायम राहण्यासाठी मेयर उत्सुक आहेत. मात्र व्हेरिझॉनच्या मार्नी वाल्डेन याच या कंपन्यांचे प्रमुखपद सांभाळणार असून, आपल्या नव्या सहकाऱ्यांची निवड अद्याप बाकी असल्याचे वाल्डेन यांनी म्हटले आहे.

याहूच्या खरेदीसाठी एटी अ‍ॅण्ड टी कंपनी, टीपीजी कॅपिटल आणि अन्य कंपन्या उत्सुक होत्या. मात्र व्हेरिझॉनने या प्रतिस्पध्र्यावर मात करीत याहूच्या खरेदीवर शिक्कामोर्तब केले.

याहूने जग बदलले आहे. व्हेरिझॉन आणि ‘एओएल’च्या माध्यमातून याहू त्याच जोमाने कार्यरत राहणार आहे. याहूसोबत कायम राहण्याचा माझा विचार आहे.

मेरिसा मेयर, मुख्य कार्यकारी अधिकारी, याहू