५०० व १ हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यापासून बाजारात चलनाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे सरकारनेही कॅशलेस व्यवहारावर भर देण्याचा आवाहन देशातील नागरिकांना केले आहे. सरकारने नोटाबंदीचा निर्णया जाहीर केल्यानंतर मोबाईल वॉलेटचा सुविधा पुरवणाऱ्या कंपन्याच्या व्यवसायात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. स्टेट बँकेनेही या व्यवसायात उतरण्याची तयारी केली असून १५ डिसेंबरपर्यंत त्यांचेही मोबाईल वॉलेट बाजारात येणार असल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांनी दिली. ओडिशामधील भुवनेश्वरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.
भट्टाचार्य म्हणाल्या, स्मार्टफोन यूजर्ससाठी बँकेचे स्टेट बँक बडी हे अॅप यापूर्वीच मोबाईल यूजर्सच्या सेवेत असून, इतर ग्राहकांनाही नेट बँकिंगचा लाभ घेता, यावा यासाठी नवे मोबाईल वॉलेट लवकरच सादर करण्यात येणार आहे. यासाठी बीएसएनएलसोबत मोबाईल वॉलेटचे काम सुरु आहे. हे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातून स्वाईप मशिनची मागणी वाढली आहे. सध्या देशभरात एसबीआयचे ४० हजार स्वाईप मशिन विविध ठिकाणी कार्यरत असून, आणखी दीड लाख मशिनची गरज आहे. त्यामुळे ही गरजही लवकरच पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी या वेळी सांगितले.

नव्या नोटांमुळे एटीएमच्या नुतनीकरणाचे काम सुरु असून, येत्या दोन ते तीन दिवसांत ते पूर्ण होईल. ओडिशामधील हे काम जवळपास पुर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली. नोटाबंदीमुळे निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी आमचे देशभरात ५६ हजार वाणिज्य प्रतिनिधी मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर उद्भवलेल्या चलन टंचाईतच डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली. याबद्दल त्यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, चलन टंचाईच्या पार्श्वभूमीवरदेखील आमच्या देशभरातील ४८ हजार एटीएम सेंटरपैकी ४० हजार एटीएम सेंटर कार्यरत होते. मात्र या सर्व एटीएम सेंटरवरुन फक्त २५०० रुपये काढण्याची मुभा असल्याने थोडीफार नागरिकांची अडचण झाली असावी.