गुजरातमध्ये हिंदू वस्त्यांमधील घरे विकण्यासाठी मुस्लिमांवर दबाब आणला जात असल्याचे उघड झाले आहे. भावनगर येथील मेघानी सर्कलजवळील एका सुखवस्तू परिसरात बंगल्याचे मालक असणाऱ्या अलीअसगर झवेरी यांना काही दिवसांपूर्वी हा अनुभव आला. या सगळ्या प्रकाराला विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) नेते प्रवीण तोगडिया आणि उजव्या विचारसरणीच्या हिंदू संघटनांचे पाठबळ आहे. अलीअसगर झवेरी यांना याठिकाणी राहायला येण्यासाठी मज्जाव करावा, म्हणून तोगडिया यांनी त्यांच्या शेजारील लोकांना चिथावणी दिली. भंगार व्यावसायिक असणाऱ्या झवेरी यांनी १० जानेवारी २०१४मध्ये भावनगरच्या या वस्तीत बंगला विकत घेतला होता. मात्र, हिंदू शेजारी, विहिंप आणि संघाच्या दबावामुळे त्यांनी ३० डिसेंबर २०१४ रोजी हा बंगला भुमिती असोसिएसटस या बांधकाम व्यावसायिक संस्थेला विकून टाकला. तीन जैन व्यवसायिकांच्या मालकीच्या असणाऱ्या भूमी असोसिएटसने काही महिन्यांपूर्वीच हा बंगला जमीनदोस्त केला.
झवेरी यांनी हा बंगला विकावा यासाठी त्यांच्या बंगल्याबाहेर रोज संध्याकाळी राम दरबारासारख्या धार्मिक उत्सवांचे आयोजन करण्यात येत होते. यावेळी स्पीकरवरून जोरजोरात हनुमान चालिसा आणि भजने वाजवली जात असत. याशिवाय, १९ एप्रिल २०१४ रोजी राम दरबारात प्रवीण तोगडियांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी झवेरी यांनी बंगला सोडला नाही, तर बंगल्यावर हल्ला चढवा असे चिथावणीखोर वक्तव्या तोगडिया यांनी केले होते. या प्रकारानंतर तोगडिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि झवेरी यांच्या बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र, हा प्रकार पाहिल्यानंतर मुस्लिमबहुल परिसरात राहत असणाऱ्या झवेरी यांनी येथे राहायला न येण्याचा निर्णय घेतला.
झवेरी यांनी या परिसरात येण्यासाठी बरेच प्रयत्न केले. इतकेच नव्हे तर त्यांनी हा बंगला हिंदू भाडेकरूला देण्याचीही तयारी दाखविली होती. याशिवाय, त्यांनी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी हा बंगला देण्याचा प्रयत्नही करून पाहिला. मात्र, आम्ही त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले. यादरम्यान, आम्ही बांधकाम व्यवसायिकांच्या संपर्कातही होतो. अखेर आपले शेजारी दाद देत नाहीत, हे पाहून अलीअसगर झवेरी यांनी बंगला विकायला तयार झाल्याची माहिती या परिसरात राहणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने दिली. भावनगर येथील मेघानी सर्कलजवळील हा परिसर हिंदू बहुसंख्यांक म्हणून ओळखला जातो. याठिकाणी एकूण १५० बंगले असून त्यापैकी फक्त चार बंगल्यांचेच मालक मुसलमान आहेत. यापैकी दोन बंगल्यात राहणाऱ्यांनी २००२च्या गोध्रा दंगलीनंतर शिशू विहार या परिसरात स्थलांतर केले. झवेरी यांनी याठिकाणी बंगला घेतल्यापासूनच येथील हिंदू रहिवाशांनी, मुस्लिमांच्या आहारपद्धतीमुळे आमच्या धर्माचा अपमान होईल, असे सांगत त्यांना प्रवेश नाकारला. याशिवाय, झवेरी यांना प्रवेश दिला तर याठिकाणी आणखी मुस्लिम येतील, अशी भिती रहिवाश्यांच्या मनात होती.