अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी रामजन्मोत्सव आयोजित केल्यानंतर आता विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमी वादावर लवकर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचे ठरवले आहे.
विश्व हिंदूू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी सांगितले की, केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक २५ मे रोजी हरिद्वार येथे होईल, त्यात पंतप्रधानांना भेटण्याची तारीख निश्चित करण्यात येईल.
धर्माचार्यांच्या या बैठकीस विश्वहिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल व प्रवीण तोगडिया उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना रामजन्मभूमीचा वाद लवकरात लवकर सोडवण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांनी अशी मागणी केली आहे की, या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचे खास पीठ स्थापन करावे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा असे सांगून ते म्हणाले की, धर्माचार्याचे एक शिष्टमंडळ गेल्यावर्षी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भेटले व माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली, पण त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही.
हरिद्वार येथील बैठकीत गेल्या ऑगस्टपासून देशात चालू असलेल्या हिंदू संमेलनांचा आढावा घेण्यात येणार असून पंचवटी मोहिमेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या मोहिमेत जून-जुलैत प्रत्येक खेडय़ात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. रामायणातील पंचवटी बागेच्या संकल्पनेवर आधारित ही मोहीम आहे, त्यात प्रत्येक खेडय़ात पाच झाडे लावली जातील, तसेच तुळशीची रोपे भेट म्हणून दिली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.