राजधानी दिल्लीत गेल्या आठवडय़ात झालेल्या सामूहिक बलात्कारातल्या २३ वर्षांच्या तरुणीची प्रकृती अधिकच खालावली आहे. संसर्गामुळे पीडित तरूणी प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
तिच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्याही सत्तर हजारापर्यंत खाली आली आहे. साधारणत: प्रत्येक मायक्रो लीटर रक्तामध्य़े हेच प्रमाण दिड लाख आणि साडेचार लाख  यांच्या दरम्यान असते. त्यात रक्तस्त्राव थांबत नसल्यानं उपचारात अडचणी येत आहेत. तसेच डॉक्टरांना भिती आहे कि, सतत होणा-या रक्तस्त्रावामुळे तरूणीचा एखादा अवयव निकामी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, श्वासोच्छवासात अडचणी येत असल्यानं तिला पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. मागच्या रविवारी ओढवलेल्या अतिप्रसंगानंतर पीडित तरूणीला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तिच्यावर तब्बल सहा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दिल्लीच्या उपराज्यपालांनी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. ट्रॅफीक आणि पीसीआर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्यावर बेपर्वाईचा ठपका ठेवण्यात आलाय. तर ट्रॅफिक विभागाच्या डीसीपींनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.