काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सोमवारी पत्रकारपरिषदेत अफजल गुरूच्या नावाचा आदरपूर्वक उल्लेख केल्याने नवा वादंग निर्माण झाला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी सुरजेवाला यांच्याकडून ही पत्रकारपरिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना सुरजेवाला यांनी अफजल गुरूच्या नावामागे ‘जी’ अशी उपाधी लावली. सुरजेवाला म्हणाले की, भारतीय राज्यघटनेवर आमचा विश्वास नसता तर सर्व कायदेशीर पर्याय आजमवल्यानंतर आम्ही अफजल गुरूला फाशी दिली नसती. दरम्यान, या प्रकरणावरून वाद निर्माण झाल्यानंतर आपण चुकीमुळे तसे बोलून गेल्याचे स्पष्टीकरण देत रणदीप सुरजेवाला यांनी दिलगिरी व्यक्त केली.