गुरुग्राममधील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या प्रद्युमन ठाकूरच्या हत्येनंतर शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या मुद्द्यावर एकीकडे गंभीर चर्चा सुरु असताना शाळांमधील निष्काळजीपणाच्या अनेक घटना समोर येत आहेत. कानपूरमधील निवादा गावातील सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षकच दारूच्या नशेत शाळेत आला. नशेतच त्याने मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. आपण काय करतो, कुठे आलो आहोत याचे भानही त्याला नव्हते.

मद्यधुंद अवस्थेतच हा शिक्षक वर्गात पोहोचला. त्याच्या शर्टाची बटणे उघडीच होती. त्याला बोलताही येत नव्हते. डुलत डुलत वर्गात आलेल्या शिक्षकाला पाहून मुलांनी त्याला घेरल्याचे व्हिडिओत दिसते. मुलांनी त्याची थट्टा उडवायलाच सुरुवात केली. अभ्यास करा असे ‘फर्मान’ही त्याने सोडले. ‘एएनआय’ने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. मद्यधुंद शिक्षकावर शाळा व्यवस्थापन कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.