बीजिंगमधील एका वाइल्ड लाइफ पार्कमध्ये वाघाने एका महिलेवर अचानक हल्ला केले. वाघाच्या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाला. काही कारणावरून चिडलेली ही महिला गाडीतून बाहेर पडली आणि गाडीतील अन्य व्यक्तीशी ती भांडत असताना मागून अचानक वाघाने तिच्यावर हल्ला केला. अन्य एका महिलेवरदेखील वाघाने हल्ला करून तिला जखमी केले. बीजिंगमधील ‘बॅडलिंग वाइल्डलाइफ वर्ल्ड’मध्ये शनिवारी ही घटना घडली. चिनी माध्यामातून आलेल्या वृत्तानुसार, संतप्त महिला कारमधून बाहेर आली. तिच्या मागून अचानक एक वाघ आला आणि त्याने तिला ओढत जंगलात नेले. महिलेला वाघाच्या तावडीतून वाचविण्यासाठी त्या कारमधून एक पुरुष आणि महिलेने बाहेर पडून वाघाच्या मागे धाव घेतली. परंतु, त्या महिलेस वाघाच्या तावडीतून वाचविण्यात त्यांना अपयश आले. हे सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य होते, जे पार्कमध्ये फिरण्यासाठी आले होते. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, ही दृश्ये त्या व्हिडिओमध्ये नजरेस पडतात. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला गाडीतून बाहेर न पडण्यास सांगण्यात आले होते. परंतु, संतापलेल्या त्या महिलेने कोणाचे ऐकले नाही आणि रागाच्याभरात ती गाडीतून बाहेर पडली. गाडीतील तो पुरुष आणि अन्य महिला या मृत महिलेचे शव घेऊन येत असताना अन्य एका वाघाने दुसऱ्या महिलेवरदेखील हल्ला केला. या महिलेचे प्राण वाचले असले तरी ती मोठ्याप्रमाणावर जखमी झाली आहे. पार्कचे कर्माचारी पोहोचेपर्यंत पहिली महिला मृत झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तर दुसऱ्या महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती त्याने दिली.

व्हिडिओ