छत्तीसगडची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच असा निर्धार केलेल्या काँग्रेसने विदर्भातील नेत्यांची मोठी फौज या राज्यात तैनात केली असून, हे सारे नेते थेट राहुल गांधीच्या मार्गदर्शनाखाली अनेक मतदारसंघांत सक्रिय झाले आहेत.
शेजारच्या छत्तीसगडमध्ये येत्या ११ व १८ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात एकूण ९० विधानसभा मतदार संघात मतदान होणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून या राज्यात भाजपची सत्ता आहे. राज्याची निर्मिती झाल्यानंतर प्रारंभीची पाच वष्रे सत्ता भोगलेल्या काँग्रेसला गेल्या दोन निवडणूकांमध्ये सतत पराभव स्विकारावा लागला आहे. या पाश्र्वभूमीवर यावेळी होणारी निवडणूक कोणत्याही स्थितीत जिंकायची, असा निर्धार केलेल्या काँग्रेसने पक्ष संघटनेत सक्रीय असलेले इतर राज्यातील अनेक नेते छत्तीसगडमधील निवडणुकीच्या मैदानात तैनात केले आहेत. विदर्भ छत्तीसगडला शेजारी असल्याने येथील अनेक नेत्यांवर छत्तीसगडमधील महत्वाच्या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
छत्तीसगडची निवडणूक पूर्णपणे राहुल गांधी यांच्या देखरेखीखाली लढवली जात असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे जबाबदारी देण्यात आलेले हे नेते थेट राहुल गांधींच्या संपर्कात आहेत. राहुल गांधी यांनी युवक काँग्रेसच्या अनेक नेत्यांना छत्तीसगडमध्ये जबाबदारी दिली आहे. अखिल भारतीय स्तरावर अनेक महत्वाची पदे सांभाळणारे गडचिरोलीचे पंकज गुड्डेवार यांना रायपूरला नेमण्यात आले आहे. औरंगाबादचे युवा नेते जितेंद्र देहाडे यांना दुर्ग ग्रामीणची जबाबदारी देण्यात आली आहे. बुलढाण्याचे धनंजय देशमुख यांना भिलाई तर जालनाचे राजेश राठोड यांना बिलासपूरची जबाबदारी देण्यात आली आहे.
या नेत्यांच्या दिमतीला युवक कॉंग्रेसचे आणखी काही पदाधिकारी देण्यात आले असून या सर्वाना मतदार संघनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. या युवा नेत्यांशिवाय कॉग्रेसने विदर्भातील काही आमदारांनासुध्दा छत्तीसगडमध्ये प्रचारात सुसूत्रता आणण्याचे काम दिले आहे. चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांना बस्तर विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसापासून वडेट्टीवार कांकेरला तळ ठोकून आहेत. एकूण १८ मतदार संघाच्या समन्वयाचे काम वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आले आहे. गडचिरोलीचे युवा आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना दंतेवाडाची जबाबदारी देण्यात आली आहे. बस्तर व गडचिरोली भागातील भौगोलिक परिस्थिती, आदिवासी समाज व नक्षलवाद्यांची उपस्थिती सारखीच असल्याने या नेत्यांना काम करणे सोपे जाईल, हा या मागील उद्देश असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. राहुल गांधींच्या मार्गदर्शनात काम करणाऱ्या या नेत्यांना केवळ दिवाळीचे दोन दिवस घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.