मद्यसम्राट विजय मल्या यांची राज्यसभेतून त्वरित हकालपट्टी करण्याची शिफारस राज्यसभेच्या नीतिमत्ता समितीने बुधवारी केली. मल्या यांचे गैरवर्तन विचारात घेता त्यांची हकालपट्टी करणे हिच योग्य शिक्षा असल्याचा निर्वाळा नीतिमत्ता समितीने आपल्या १०व्या अहवालात दिला. समितीचे अध्यक्ष करणसिंह यांनी बुधवारी हा अहवाल सभागृहात मांडला.
विजय मल्या यांच्या पत्रासह अन्य सर्व बाबींचा सारासार विचार केल्यानंतर नीतिमत्ता समितीने ३ मे रोजी झालेल्या बैठकीत, मल्या यांची राज्यसभेतून त्वरित हकालपट्टी करण्याची शिफारस केली. अशा प्रकारची कठोर कारवाई केल्याने दोषी सदस्यांविरुद्ध कारवाई करण्यास संसद कचरत नाही, हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविता येईल आणि या महान संस्थेची प्रतिष्ठा अबाधित राहील, असे अहवालात म्हटले आहे.
मल्या यांनी विविध बँकांकडून घेतलेले कर्ज आणि अन्य बाबी जाहीर केलेल्या नाहीत, त्याबाबत आता राज्यसभा नीतिमत्ता समितीच्या शिफारशी पाहतील. मल्या यांनी काही कायदेशीर आणि घटनात्मक मुद्दे उपस्थित केले आहेत ते ग्राह्य़ नाहीत कारण सर्वोच्च न्यायालयाने, सदस्याची हकालपट्टी करण्याबाबत राज्यसभेचे अधिकार मान्य केले आहेत, असे अहवालात म्हटले आहे.