भारतीय स्टेट बॅंक आणि सहकारी बॅंकेचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळून गेलेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक असणारी परवानगी ब्रिटिश सरकारने दिली आहे. याबाबत ब्रिटिश न्यायालय लवकरच वारंट काढणार आहे असे परराष्ट्र खात्याने सांगितले आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये भारताने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याला भारताकडे सोपवावे या आशयाची विनंती केली होती. भारताची प्रत्यार्पणाची विनंती त्यांनी मान्य केली असल्याचे परराष्ट्र खात्याने सांगितले आहे. गृहखात्याने परवानगी दिल्यानंतर त्यांनी भारताचा अर्ज स्थानिक न्यायालयाकडे पाठवण्यात आला आहे. मल्ल्याविरोधात वारंट काढण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. ती परवानगी मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि इतर सहकारी बॅंकांचे ९,००० कोटी रुपये बुडवून विजय मल्ल्यांनी २०१६ मध्ये ब्रिटनमध्ये पळ काढला. आयडीबीआयचे ७२० कोटी रुपये बुडवल्याप्रकरणीदेखील विजय मल्ल्या विरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आले आहे.