बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी भेट दिल्यानंतर मंदिराचे ‘शुद्धिकरण’ करण्याच्या प्रकाराच्या चौकशीसाठी गेलेल्या उच्चस्तरीय समितीवरही स्थानिक गावकऱ्यांनी हल्ला करण्याचा प्रकार आज घडला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांच्या प्रचारदौऱ्यावर असताना मधुबनी जिल्ह्य़ातील ब्रrोश्वर मंदिरात आपण जाऊन आल्यानंतर गावकऱ्यांनी या मंदिराचे ‘शुद्धिकरण’ केले, असा गौप्यस्फोट स्वत: मांझी यांनीच गेल्या रविवारी केला होता. आपण अगदी खालच्या जातीचे असल्याने हे शुद्धिकरण करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. या पाश्र्वभूमीवर या प्रकाराची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय समिती आज संबंधित गावात चौकशीसाठी गेली होती. मात्र गावकऱ्यांनी शुद्धिकरणाचा प्रकार घडलाच नसल्याचा दावा केला. मंदिर रोजच धुतले जाते, असेही त्यांनी समितीला सांगितले. मात्र वादावादीनंतर वातावरण तापले आणि त्याचे पर्यवसान समितीवर हल्ला करण्यात झाले. यामध्ये समितीच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेले दोन पोलीस जखमी झाले.