भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. भारताने सर्जिकल स्ट्राईक केले नसून फक्त गोळीबार केल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. परंतु या घटनेनंतर पाकिस्तानकडून काही लष्करी हालचाली झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सतर्क झाले आहे. पाकिस्तान सीमेरेषेपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजाबमधील काही गावे रिकामी करण्यात आली असून येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या भागात सीमा सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवस भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुटीवर असलेल्या सीमेवरील सैनिकांना परत बोलावण्यात आले आहे. तसेच सीमेजवळील शाळांनाही सुटी देण्यात आली आहे.
काही दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर एकत्र आल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने या दहशतवादी तळावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले असल्याची माहिती भारतीय लष्कराचे डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली.
उरी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकटा पडला होता. पाकिस्तान हा दहशतवाद समर्थक देश असल्याची प्रतिमा ठळकपणे समोर आली होती. अमेरिकेसह अनेक देशांनी पाकिस्तानवर टीका केली होती. भारतानेही उरी हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देण्याची घाई न करता कूटनीतीचा वापर करत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पाडले होते.