चंद्रावरचे दुर्मीळ फोटो, नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर ठेवलेल्या पहिल्या पावलाचा फोटो तसेच इतर अनेक दुर्मीळ फोटोंचा लिलाव नासा करणार आहे. ३१ ऑक्टोबरपासून हा लिलाव सुरू होणार आहे. ‘CNN’ या वृत्तवाहिनीने या संदर्भातले ट्विट केले आहे.

अंतराळवीरांनी काढलेल्या अनेक दुर्मीळ छायाचित्रांचा समावेश यामध्ये आहे. नासाची चांद्र मोहीम आणि तिथून परतत असताना काढलेले फोटो यांचा लिलाव सुरू करण्यात येणार आहे. लिलावात एका फोटोसाठी कमीत कमी ९ हजार डॉलरची बोली लागू शकते असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. या फोटोंमध्ये एकूण ४४६ फोटोंचा समावेश आहे.

३१ ऑक्टोबरपासून लिलाव सुरू होणार

अंतराळवीरांनी चंद्रावरच्या हालचाली आणि तिथून परतत असतानाच्या आठवणी त्यांच्या कॅमेरात कैद केल्या. त्यांनी काढलेले हे फोटो विलक्षण अनुभव देणारे आहेत. पाच दशकांनी या फोटोंचा लिलाव होणार आहे. वैज्ञानिक महत्त्वासोबतच ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे हे सगळेच फोटो कौतुकास्पद ठरले आहेत. या फोटोंचा लिलाव ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती स्किनर ऑक्शनर्स अँड अप्रेजर्स यांनी दिली आहे.