भारतात लैंगिक हिंसाचाराबाबत मौन बाळगले जात असून त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत, अशी टीका ब्रिटनमधील अनेक स्त्रीवादी संघटनांनी केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याची जाणीव करून देणारे पत्र पाठवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवडय़ात ब्रिटनचा दौरा करणार असून त्याआधीच त्यांनी हे पत्र पाठवले आहे.
पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधानांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जे संबंध आहेत ती चिंतेची बाब आहे. इटलीची फॅसिस्ट संघटना व जर्मनीचा नाझी पक्ष यांच्याशी त्यांनी तुलना केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्रिटनमधील शाखांची ब्रिटिश धर्मादाय आयुक्तालयाकडून चौकशी चालू आहे. कारण ते ख्रिश्चन व मुस्लिमांविरोधात द्वेषमूलक कारवाया करीत आहेत. पंतप्रधानांना असे गुन्हे, रा. स्व. संघाच्या आशीर्वादाने होणारा पुरुषसत्ताक हिंसाचार मान्य आहे काय, अशी विचारणा केली असून जर असेल तर त्यांनी या घटनांचा उघडपणे निषेध करावा. काही हिंदूुत्ववादी संघटना नैतिक पोलिसगिरी करतात, जोडप्यांवर हल्ले करतात तेव्हा पंतप्रधानांचे मौन म्हणजे त्याला मूकसंमती ठरते. २००२ मधील गुजरात दंगलींमध्ये झालेला हिंसाचाराचाही उल्लेख त्यात आहे. या पत्रावर अपना हकच्या संचालक झलाखा अहमद,
आशा प्रोजेक्ट्सच्या संचालक इला पटेल, आशियाना नेटवर्कच्या संचालक शमिंदर उभी,
आशियन विनेन्स रिसोर्स सेंटरच्या संचालक सरबजित गँगर, ब्लॅक असोसिएशन विमेन स्टेप आउटच्या संचालिका वेन्या चिंबा, दोस्तियोच्या संचालिका अंजोना रॉय यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.