छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्य़ात करताळाच्या जंगलात संतप्त हत्तींच्या कळपाने तीन महिलांना जागीच ठार केले. या महिला जंगलातून साधनसामुग्री गोळा करण्यासाठी गेल्या असताना रविवारी सकाळी ही घटना घडली. त्यात १५ ते १७ हत्तींच्या कळपाने या महिलांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याचे विभागीय वन अधिकारी जे.आर.नायक यांनी सांगितले.
  ही घटना समजताच पोलिस व वन अधिकारी तेथे गेले. मृतांमध्ये मानकुंवर (३३), दिलकुंवर (६०) व कमलाबाई (५०) या तीन महिलांचा समावेश आहे, त्या जवळच्या खेडय़ात राहणाऱ्या होत्या. मृतांच्या नातेवाईकांना तूर्त प्रत्येकी १० हजार रुपये भरपाई जाहीर करण्यात आली असून नंतर सरकारी धोरणानुसार प्रत्येकी २.९० लाख रुपये भरपाई दिली जाणार आहे.
छत्तीसगडमधील जंगल दाट असून त्यात सूरगुजा, कोरबा, राजगड, जशपूर, कोरिया या जिल्ह्य़ांचा समावेश होतो. हा भाग माणूस-हत्ती यांच्या संघर्षांसाठी ओळखला जातो.