व्यावसायिक वादांमुळे काही वर्षांपूर्वी नात्यात दुरावा आलेल्या अंबांनी बंधुंचा आता ‘व्हर्च्युअल’ समेट घडून येणार आहे. अनिल अंबांनी यांची रिलायन्स कम्युनिकेशन आणि मुकेश अंबांनी यांची रिलायन्स जिओ या दोन्ही कंपन्यांमध्ये टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर वाटून घेण्याचा करार झाला आहे. अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स कॅपिटलची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत झाली. यावेळी अनिल यांचे ज्येष्ठ पुत्र २४ वर्षीय जय अनमोल यांच्या कार्यकारी संचालकपदाला मान्यता देण्याबरोबरच रिलायन्स जिओशी करण्यात आलेल्या व्हर्च्युअल मर्जरची घोषणा करण्यात आली.  आम्ही दोघे भाऊ आता धीरूभाईंचे स्वप्न साकारण्यासाठी एकत्र काम करणार असल्याचे अनिल यांनी सांगितले. आमच्या कंपनीकडे सर्वप्रकारचे २ जी, ३ जी आणि ४ जी स्पेक्ट्रम असून आम्ही रिलायन्स जिओशी स्पेक्ट्रम व्यापार आणि शेअरिंगचा करार केला आहे. व्यवहारिक कारणांचा विचार करून रिलायन्स कम्युनिकेशन आणि रिलायन्स जिओने व्हर्च्युअल मर्जर केल्याचे अनिल यांनी सांगितले.
या करारानुसार रिलायन्स जिओला अनिल अंबांनी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनकडे असलेल्या मोबाईल स्पेक्ट्रमचा उपयोग करता येणार आहे. याशिवाय, जिओ रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या टॉवरचाही उपयोग करू शकणार आहे. या करारामुळे रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या खर्चातही बचत होणार आहे. या निर्णयामुळे अन्य मोबाईल नेटवर्क कंपन्यांपुढे मोठे आव्हान  उभे राहणार आहे.

पुत्र जय अनमोलचे अनिल अंबानी यांच्याकडून भागधारकांपुढे कोडकौतुक

जय अनमोल संचालक मंडळात दाखल झाल्यापासून रिलायन्स कॅपिटलचा समभाग ४० टक्क्यांनी झेपावला, अशा शब्दांत आपल्या पुत्राचे कौतुक करत कंपनीचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी रिलायन्स कॅपिटलसाठी हा सकारात्मक ‘अनमोल इफेक्ट’ असल्याचे नमूद केले. काही दिवसांपूर्वीच कंपनीत रुजू झालेल्या जय अनमोल यांच्या पायगुणावर रिलायन्स कॅपिटलचे कर्जही कमी होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स कॅपिटलची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत झाली. अनिल यांचे ज्येष्ठ पुत्र २४ वर्षीय जय अनमोल यांच्या कार्यकारी संचालकपदाला या सभेत मान्यता देण्यात आली. याबाबतचा विश्वासदर्शक ठराव सभेत मंजूर करण्यात आला. त्या वेळी अनिल अंबानी यांनी भाषण केले.
जय अनमोलबद्दल त्यांनी सांगितले की, जय अनमोलचे नशीब बघा. तो कंपनीच्या संचालक मंडळात आल्यापासून रिलायन्स कॅपिटलचे समभाग मूल्य तब्बल ४० टक्क्यांनी वाढला आहे. आपल्या भागधारकांसाठी हे मूल्य संपत्ती निर्माणासारखेच आहे. कार्यपद्धती सुधारणे, विकास साधणे या आधारावर ‘अनमोल इफेक्ट’ यापुढेही कायम असेल.
जय अनमोल यांची २३ ऑगस्ट रोजी रिलायन्स कॅपिटलचे अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. मंगळवारच्या बैठकीत त्यांना कार्यकारी संचालक म्हणून मान्यता देण्यात आली. जय अनमोल यांच्या आई व कंपनीच्या एक संचालिका टीना अंबानी यांनीही जय अनमोलला भागधारकांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास सभेदरम्यान व्यक्त केला.
ब्रिटनमधून व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेल्या जय अनमोल यांचा रिलायन्स समूहाच्या वित्तीय सेवा व्यवसायात सहभाग राहिला आहे. रिलायन्सची भागीदार जपानी निप्पॉन लाइफच्या हिस्सावाढीच्या कालावधीत त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.