इन्फोसिसचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष एन. आर. नारायण मूर्ती यांनी कंपनीच्या संचालक मंडळाकडून करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले. ‘संचालक मंडळाकडून करण्यात आलेल्या सर्व आरोपांना योग्यवेळी योग्य पद्धतीने उत्तर देण्यात येईल. आरोपांना घाई गडबडीत उत्तर देणे, माझ्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे,’ असे मूर्ती यांनी म्हटले. ‘मी २०१४ मध्येच इन्फोसिसच्या संचालक मंडळातून बाहेर पडलो. तेव्हा मी माझ्या कुटुंबाचा आणि मुलांचा विचार केला नाही,’ असेदेखील त्यांनी पुढे बोलताना म्हटले. संचालक मंडळाच्या आरोपांना योग्य व्यासपीठावरुन उत्तर देऊ, असे मूर्तींनी स्पष्ट केले.

विशाल सिक्का यांनी इन्फोसिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर कंपनीकडून एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विशाल सिक्का यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, असे संचालक मंडळाने म्हटले. विशाल सिक्का यांना संचालक मंडळाचे पूर्ण समर्थन असल्याचे कंपनीचे सहअध्यक्ष रवी व्यंकटेशन यांनी वारंवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. यावेळी सिक्का कॅलिफोर्नियामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. सिक्का यांनीदेखील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

‘संचालक मंडळाच्या निर्णयामुळे आणि त्यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांमुळे दु:खी आहे. इन्फोसिस कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे. माझ्या राजीनाम्याचा कंपनीच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही,’ असे सिक्का यांनी म्हटले. यापुढे सिक्का यांची जबाबदारी यू. बी. प्रवीण राव यांच्याकडे असेल, अशी माहिती सहअध्यक्ष रवी व्यंकटेशन यांनी दिली. ‘प्रवीण राव त्यांच्या कामाची माहिती सिक्का यांनाच देतील. ३१ मार्च २०१८ पर्यंत सिक्का यांचा पर्याय शोधण्यात येईल. तोपर्यंत सिक्का तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित विभागांमध्ये काम करतील,’ असेही त्यांनी पुढे बोलताना म्हटले.