..तर अयोध्येत एक वीटही हलवू न देण्याचा सपाचा इशारा
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा ठरला असतानाच, देशातील प्रत्येक गावात राममंदिर उभारण्याची घोषणा विश्व हिंदू परिषदेने केली आहे. याचवेळी, न्यायालयाच्या परवानगीशिवाय अयोध्येत एक वीटही हलवू देणार नाही, असे राज्य सरकारने बजावले आहे.
देशातील प्रत्येक खेडय़ात राममंदिर उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. १५ एप्रिल, म्हणजे रामनवमीपासून विहिंप देशभरात सात दिवसांचा ‘राम महोत्सव’ साजरा करेल. या सप्ताहात प्रत्येक खेडय़ात श्रीरामाचे पूजन केले जाईल. पूजन केलेली मूर्ती किंवा प्रतिमा पूजनस्थळीच स्थापन केली जाईल. यापूर्वीही आम्ही राम महोत्सवाच्या माध्यमातून भारतातील ७० ते ७५ हजार खेडय़ांशी संपर्क साधला आहे. यावेळी सव्वा लाख खेडय़ांपर्यंत पोहचण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे विहिंपचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी सांगितले.
अयोध्येतील रामजन्मभूमीवर श्रीरामाचे मंदिर बांधण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे, परंतु उत्तर प्रदेशातील पुढील वर्षीच्या निवडणुकांच्या तोंडावर तो पुन्हा प्रकाशझोतात आला आहे.
राममंदिराचा मुद्दा उचलण्याचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांशी संबंध आहे काय, असे विचारले असता शर्मा म्हणाले, की भगवान रामाला कुठल्याही निवडणुकांशी जोडले जाऊ नये. राम हा देशातील कोटय़वधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे.
अयोध्येत राममंदिराच्या बांधकामासाठी देशभरातून शिला गोळा करण्याची घोषणा विहिंपने केल्यानंतर सहा महिन्यांनी, गेल्या डिसेंबरमध्ये दोन मालमोटारी भरून शिला अयोध्येत पोहचल्या होत्या. या शिला विहिंपच्या रामसेवक पुरममध्ये पोहचल्या असून राम जन्मभूमी न्यासचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्या हस्ते शिलापूजन करण्यात येत आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
अयोध्येत राममंदिर उभारण्याची वेळ आली असून, मंदिराचे बांधकाम  करण्यात येईल, असे संकेत आम्हाला मोदी सरकारकडून मिळाले आहेत, असा दावा शर्मा यांनी केला.

न्यायालयाच्या संमतीशिवाय अयोध्येतील वादग्रस्त जागेवर कुठलेही मंदिर बांधण्याची परवानगी दिली जाणार नाही. एक वीटदेखील हलवू दिली जाणार नाही.
  – शिवपाल सिंह, समाजवादी पक्षाचे नेते