विश्वरुपम चित्रपटावर तमिळनाडूमध्ये घातलेल्या बंदीला स्थगिती देण्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने रद्दबातल ठरविला. या चित्रपटावरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला.
भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १४४ नुसार तमिळनाडूमधील सर्व ३१ जिल्हाधिकाऱयांनी काढलेल्या आदेशात विश्वरुपम चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, न्या. के. वेंकटरमण यांनी यासंदर्भातील अंतरिम सुनावणीत संबंधित आदेशाला मंगळवारी स्थगिती दिली. त्यामुळे या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता.  त्यानंतर बुधवारी तमिळनाडू सरकारने त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगिती उठविण्याची मागणी केली होती.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय कमल हसन यांनी घेतला आहे.