मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जियोची ४जी सेवा सुरू झाल्यानंतर देशभरातील टेलिकॉम कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जियोला टक्कर देण्यासाठी विविध कंपन्यांकडून टॅरिफ आणि डेटा प्लानच्या दरांमध्ये मोठी कपात केली जाते आहे. जियोच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आता वोडाफोननेदेखील डेटागिरी करण्याचा निेर्णय घेतला आहे. वोडाफोनकडून प्रीपेड मोबाईल धारकांना २५५ रुपयांवरील सर्व ४जी रिचार्जवर दुप्पट डेटा देणार आहे. या डेटा पॅकची वैधता २८ दिवसांची असणार आहे. त्यामुळे वोडाफोनच्या ग्राहकांना दुप्पट डेटा वापरता येणार आहे.

वोडाफोनच्या सध्याच्या सर्व ग्राहकांना या अतिरिक्त इंटरनेट डेटाचा लाभ घेता येणार आहे. २५५ रुपयांपासून सुरू होणाऱ्या सर्व ४जी रिचार्जवर दुप्पट डेटा दिला जाणार आहे. त्यामुळे ९९९ रुपयांना ४जी इंटरनेटचा १० जीबीचा डेटा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता त्याच पैशांमध्ये २० जीबी डेटा वापरता येणार आहे. रिलायन्सचे आव्हान मोडीत काढण्यासाठी वोडाफोनकडून ही खेळी करण्यात आली आहे.
‘वोडाफोनकडून सर्व ग्राहकांना डबल डेटा बोनॅन्जा ऑफर दिली जाते आहे. वोडाफोन ४जीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या ग्राहकांसाठी नवी योजना सुरू करत आहोत. आमच्या सर्व ग्राहकांसाठी ही योजना उपलब्ध असेल,’ अशी माहिती दिल्ली वोडाफोनचे एनसीआरचे बिझनेस हेड अपूर्व मल्होत्रा यांनी दिली आहे.

याआधी वोडाफोनने ‘बडा पॅक छोटा प्राईज’ ही ऑफर आणली होती. या पॅकची दिल्लीमधील किंमत २४ रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना ३० दिवसांची वैधता मिळते. दिल्लीत २४ रुपयांमध्ये ६० एमबी डेटा आणि ३७ रुपयांमध्ये १२० एमबी डेटा ग्राहकांना वापरता येतो.
‘आम्ही ग्राहकांना डेटा कमी किमतीत देऊ इच्छितो. ज्यामुळे सर्वांना इंटरनेट वापरता येणे शक्य होईल. पहिल्यांदा ऑनलाईन आलेल्या ग्राहकांनी इंटरनेटचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून हे पाऊल उचलले आहे. ‘जास्त डेटा कमी किंमत’ या योजनेमुळे लोकांना पूर्ण महिना इंटरनेट वापरता येईल,’ असे वोडाफोन इंडियाचे व्यावसायिक अधिकारी संदीप कटारिया यांनी सांगितले आहे.