आपल्या प्रिपेड ग्राहकांनी आपली सेवा सोडून इतरत्र कुठे जाऊ नये यासाठी व्होडाफोनने आधीच्याच किमतीमध्ये चौपट ४ जी डेटा देण्याचा निर्णय घेतला आहे. जिओने आपली सेवा ३१ मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर व्होडाफोनने आपली सेवा स्वस्त करण्याचा आज निर्णय घेतला आहे. १५० रुपयांना असणाऱ्या डेटा पॅकमध्ये १ जीबी डेटा एका महिन्यासाठी मिळणार आहे. २५० रुपयांमध्ये ४ जीबी डेटा तर १,५०० रुपयांमध्ये ३५ जीबी डेटा देण्याची ऑफर व्होडाफोनने आपल्या ग्राहकांना दिली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून एअरटेल, व्होडाफोन आणि आइडिया कंपन्यांमध्ये आपल्या किमती करण्याची जणू चढाओढच लागली आहे.

या डेटा पॅकच्या किमती सर्कलनुसार वेगवेगळ्या असू शकतील असे व्होडाफोनने जाहीर केले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म तसेच रिटेल स्टोअरमध्ये या नव्या ऑफरचा लाभ घेता येऊ शकेल. आधी ज्या किमतीमध्ये तुम्ही १ जीबी डेटा विकत घेऊ शकत होता त्याच किमतीमध्ये ४ जीबी डेटा देणार असल्याचे कंपनीने सांगितले. तर १० जीबी डेटासाठी लागणाऱ्या किमतीमध्ये तुम्हाला २२ जीबी डेटा मिळणार आहे. १ जीबी ४ जी डेटा १५० रुपयांना मिळणार आहे, ४ जीबी ४ जी डेटा २५० रुपयांना मिळेल, ६ जीबी ४ जी डेटा ३५० रुपयांना मिळेल, ९ जीबी ४ जी डेटा ४५० रुपयांना मिळेल, १३ जीबी ४ जी डेटा ६५० रुपयांना मिळेल, २२ जीबी ४ जी डेटा ९९९ रुपयांना मिळणार आहे तर ३५ जीबी ४ जी डेटा १,५०० रुपयांना मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

आमच्या ग्राहकांच्या वाढत्या गरजा पाहून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे व्होडाफोनचे अधिकारी संदीप कटारिया यांनी म्हटले. त्यामुळे आधीच्याच किमतीमध्ये आम्ही जास्त डेटा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे कटारिया यांनी म्हटले. दरम्यान व्होडाफोनने आजपासून चंडीगडमध्ये ४ जी सुपरनेट सेवेचा शुभारंभ केला आहे. मार्च अखेरीस देशाच्या २४०० शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होईल. याआधी एअरटेलनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वर्षभरासाठी ९,००० रुपये किंमत असलेला डेटा मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. जर तुम्ही ३४५ रुपयांचे रिचार्ज केले तर दर महिन्याला ३ जीबी डेटा मिळेल अशी ऑफर एअरटेलने दिली होती. तसेच, मोफत अमर्यादित कॉलिंगही देण्यात आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये या सर्व कंपन्यांमध्ये चढाओढ लागली आहे. ३१ मार्च रोजी जिओची मुदत संपणार आहे. ही मुदत संपण्याआधीच कंपन्या आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी नवीन ऑफर देत आहेत.