राज्यातील प्रत्येकी पाचपैकी तीन मतदारांना केंद्रात ज्या पक्षाचे सरकार आहे त्याच पक्षाचे सरकार राज्यात यावे असे वाटले. यामुळेच भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, असा निष्कर्ष ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हल्पिंग स्टडीज’ (सीएसडीएस)ने मतदानोत्तर सर्वेक्षणात काढला आहे. महाराष्ट्रासह हरयाणातील नागरिकांचीही हीच भावना असून, सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि सेनेने एकत्र यावे अशी इच्छा २७ टक्क्यांनी तर भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र यावे अशी इच्छा चार टक्क्यांनी व्यक्त केल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हे प्रमाण ४० टक्के इतके आहे.
* सर्वेक्षणातील ४३ टक्के सहभागींना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार महत्त्वाचा वाटला नाही, मात्र ५७ टक्के सहभागींनी विविध नेत्यांना या पदासाठी पसंती दिली. राज्यातील सुमारे ३१ टक्के जनतेने भाजपला कौल दिला आहे. या पक्षाने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला नव्हता.
* केंद्रात ज्या पक्षाचे सरकार आहे, त्याच पक्षाचे सरकार राज्यात आले तर राज्याच्या विकासाला फायदा होईल का, या प्रश्नाला ४१ टक्के मतदारांनी सकारात्मक उत्तर दिले, तर १८ टक्के मतदारांनी काही प्रमाणात आपली सहमती दर्शविली.
* राज्यातील विविध समाजाच्या लोकांच्या मतदानाचा अभ्यास केल्यावर सर्वेक्षणात असे समोर आले की मराठा आणि कुणबी समाजाने भाजपला पसंती दिली आहे. याचबरोबर आदिवासी, अनुसूचित जाती आणि सवर्ण जातीतील मतदारांनीही भाजपला पसंती दिली आहे. मुस्लिम समाजाची मते काँग्रेसबरोबर राहिली असली तरी यातील काही मते एमआयएम किंवा इतर पक्षांकडे वळल्याचे निरीक्षणही यात नोंदविले आहे.
* भाजपला मिळालेली सर्वाधिक मते ही शहरी आणि निमशहरी भागांतील आहे. तर भाजपच्या एकूण मतांपैकी २५ टक्के मते ही ग्रामीण भागांतील आहेत. हे प्रमाण इतर पक्षांच्या तुलनेत जास्त आहे.
* राज्याचे नेतृत्त्व कोणी करावे, याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ४३ टक्के मतदारांनी ‘सांगता येणार नाही’, असे नमूद केले. तर सर्वाधिक म्हणजे ११ टक्के पसंती ही उद्धव ठाकरे यांनाच मिळाली. देवेंद्र फडणवीस यांना दहा टक्के पसंती होती.
* नेत्यांपेक्षा स्थानिक प्रश्नांना प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया ३५ टक्के मतदारांनी दिली आहे. तर २१ टक्के मतदारांनी स्थानिक समस्यांपेक्षा नेत्याला प्राधन्य दिल्याचे सर्वेक्षात नमूद आहे.
* काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार हे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सर्वाधिक भ्रष्टाचारी असल्याचे मतही नोंदविले गेले आहे. हे प्रमाण लोकसभेच्या निकालानंतर कमी झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. राज्यातील केवळ तीन टक्केच लोकांना हे सरकार भ्रष्टाचारी नसल्याचे वाटते.
* विदर्भ वेगळे झाले पाहिजे का, या प्रश्नाला उत्तर देताना ५१ टक्के विदर्भवासीयांनी होकार दर्शविला तर उर्वरित महाराष्ट्रातील ३८ टक्के मतदारांनी पूर्ण विरोध दर्शविला. स्वतंत्र विदर्भाला उर्वरित महाराष्ट्रातील केवळ १० टक्के मतदारांचाच पाठिंबा आहे, तर स्वतंत्र विदर्भास १० टक्के विदर्भवासियांचाही विरोध आहे.  
*सेना आणि भाजप यांच्यातील युती तुटण्यासाठी भाजप कारणीभूत असल्याचे २९ टक्क्यांना वाटते तर २० टक्क्यांनी शिवसेनेला जबाबदार धरले आहे. २४ टक्क्यांना दोन्ही पक्ष सारखेच कारणीभूत असल्याचे वाटते.
* आघाडीतील बिघाडीसाठी राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे मत २६ टक्के मतदारांनी नोंदविले, तर १८ टक्क्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.
* काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे नेते हे सर्वाधिक भ्रष्टाचारी असल्याचे मत २० टक्क्यांनी नोंदविले आहे तर काँग्रसे भ्रष्टाचारी असल्याचे मत १५ टक्क्यांनी नोंदविले आहे. ३९ टक्क्यांनी दोन्ही पक्ष भ्रष्टाचाराच्या पातळीवर एकाच पारडय़ात असल्याचे नमूद केले आहे.
* छत्रपती शिवरायांच्या नावाचा जप भाजपने प्रचार मोहिमेत हिरिरीने केला. मात्र शिवरायांचा वारसा समर्थपणे कोण चालवू शकतो, या प्रश्नाला शिवसेनेलाच सर्वाधिक, ३७ टक्के एवढा कौल मिळाला असून, भाजपला अवघी ११ टक्के मते मिळाली आहेत.
* शिवसेनेपेक्षा भाजप हाच जातीयवादी पक्ष असल्याचेही मत सर्वेक्षणात पुढे आले आहे. सर्वसाधारण १५ टक्के आणि मुस्लिम २५ टक्के मतदारांना भाजप हा जातीयवादी वाटतो. तर सर्वसाधारण १८ टक्के आणि मुस्लिम १८ टक्के मतदारांना शिवसेना जातीयवादी वाटतो, असे या सर्वेक्षणात दिसून आले.
vdh099