जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या डायक्लोफेनेक या औषधामुळे गिधाडांची संख्या कमी होत आहे, कारण ही गिधाडे या जनावरांच्या मृतदेहांचा वापर अन्नासाठी करीत असतात, पण आता गिधाडांना वाचवण्यासाठी डायक्लोफेनेकच्या बहुमात्रेच्या इंजेक्शन कुपीवर बंदी घालण्यात आली आहे. डायक्लोफेनेकमुळे सूज व वेदना कमी होतात. या औषधाची बहुमात्रा असलेले इंजेक्शन गुरांना दिले जाते, पण ही गुरे काही कारणाने दगावल्यास त्यांच्या मृतदेहांवर जगणाऱ्या गिधाडांना डायक्लोफेनेकमुळे रोग होऊन ते मरतात. त्यात गिधाडांचे मूत्रपिंड, यकृत यावर विपरीत परिणाम होत असतो.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे की, गुरांमध्ये नेहमी वापरले जाणारे डायक्लोफेनेक हे औषध गिधाडांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांना जीवदान मिळणार आहे. माणसांमध्येही डायक्लोफेनेकचा वापर केला जातो, पण तोही एकाच मात्रेपर्यंत मर्यादित केला गेला आहे. पर्यावरण मंत्रालयाने आरोग्य मंत्रालयाशी चर्चा करून १७ जुलैला त्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. डायक्लोफेनेक बहुमात्रेत देऊ नये असे र्निबध घातले असतानाही पशुउपचारांसाठी त्याच्या इंजेक्शनचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे. सरकारने २००६ मध्ये पशुउपचारांसाठी डायक्लोफेनेकचा वापर करण्यावर बंदी घातली होती. भारतासह दक्षिण आशियात गिधाडांची संख्या कमी होत असताना पर्यावरणवाद्यांनी डायक्लोफेनेकचा बेकायदेशीर वापर सुरूच असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.