अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याची माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅंटनी यांनी सोमवारी दिली. या व्यवहारात लाचखोरी झाल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
लाचखोरीचा तपास आता निर्णायक टप्प्यात आलाय. हेलिकॉप्टर खरेदीत लाचखोरी करणाऱया कोणावरही दया दाखविली जाणार नाही. संबंधित व्यक्ती कितीही मोठ्या पदावर काम करीत असली, तरी त्याच्यावर आम्ही कारवाई करणारच, असे अ‍ॅंटनी यांनी स्पष्ट केलंय.
सुमारे ३६०० कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात लाचखोरी झाल्याचे इटलीमध्ये झालेल्या तपासातून पुढे आले होते. माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी आणि त्यांच्या नातलगांवर या व्यवहारात लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाने गेल्याच आठवड्यात त्यागी यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. तसेच त्यांची चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर अ‍ॅंटनी यांनी या व्यवहारात लाचखोरी झाल्याचे म्हटले आहे.
अ‍ॅंटनी हे लष्करी साहित्य खरेदीसाठी नवे धोऱण तयार करीत असून, ते आता अंतिम टप्प्यात आले आहे.