अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी घेण्यात येणाऱ्या ३६०० कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) इटली, मॉरिशस आणि टय़ुनिशिया येथून माहिती मागविली आहे. ऑगस्टावेस्टलँड या कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील भारताला देण्यात यावा, अशी विनंती करणारी न्यायालयीन मागणीची प्रत या देशांकडे पाठविण्यात आली आहे.
या हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारांमध्ये लाचखोरी झाल्याचा दावा इटलीमध्ये करण्यात आल्याने भारतात या व्यवहारांभोवती संशयाचे जाळे निर्माण झाले होते. या आरोपांची शहानिशा करण्यासाठी कंपनीतर्फे सक्रिय असलेले मध्यस्थ, त्यांचे या खरेदी प्रकरणाशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार यांचा तपशील खुला होणे गरजेचे होते. म्हणून ही माहिती मागविण्यात आली आहे.
इटलीतील फिनमेक्कानिका या कंपनीच्या तसेच ब्रिटनस्थित ऑगस्टावेस्टलँड या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांवर १२ हेलिकॉप्टरची विक्री करताना लाचखोरीचा आरोप आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. तसेच ३६०० कोटी रुपयांच्या या व्यवहारांमध्ये संबंधित भारतीय अधिकाऱ्यांनाही लाच दिल्याचा आरोप आहे. या अधिकाऱ्यांमध्ये माजी हवाईदल प्रमुख एस.पी. त्यागी यांचाही समावेश आहे. टय़ुनिशिया आणि मॉरिशस येथील सहकारी कंपन्यांमार्फत ही लाच भारतीय अधिकाऱ्यांकडे पोहोचती केली गेल्याचा ठपका असल्याने कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.