मध्य प्रदेशमधील व्यापमं घोटाळ्यातील मुख्य आरोपी प्रवीण यादव याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येमागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही. प्रवीणचा मृतदेह मध्य प्रदेशमधील मोरेना येथील त्याच्या राहत्या घरात पोलिसांना आढळून आला. या प्रकरणात आतापर्यंत ४० आरोपींचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घोटाळ्यात अनेक राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश होता.

मध्य प्रदेश व्यावसायिक मंडळाच्या वतीने (व्यापमं) सरकारी नोकरीसाठी परीक्षा घेतली जाते. या घोटाळ्यात पैसे घेऊन परीक्षा पास केल्याचे आढळून आले होते. हा घोटाळा १९९० पासून सुरू होता. या घोटाळ्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल रामनरेश यादव यांचा मुलगा शैलेश याचाही मागील वर्षी मृत्यू झाला होता. या घोटाळ्यात त्याचे नावही होते. परंतु, यादव कुटुंबीयांनी त्याचा मृत्यू हा आजारी असल्यामुळे झाल्याचा दावा केला होता.

हा घोटाळा २०१३ मध्ये उघड झाला होता. याप्रकरणी इंदूर पोलिसांनी २० लोकांना अटक केली होती. यामध्ये जगदीश सागर नावाच्या व्यक्तीचाही समावेश होता. त्यानंतर राज्य सरकारने २६ ऑगस्ट २०१३ रोजी या घोटाळ्याच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती.

याप्रकरणी एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराचीही चौकशी करण्यात आली होती. परंतु, नंतर काही दिवसांत त्याचाही संशयास्पद मृत्यू झाला होता. या घोटाळ्याचे लागेबंधे अनेक मोठ्या नेत्यांशी असल्याने अद्यापपर्यंत ठोस माहिती मिळू शकलेली नाही.