व्यापमं घोटाळा हा किरकोळ विषय असून, त्यावर पंतप्रधानांनी कोणतेही भाष्य करण्याची मला गरज वाटत नाही… हे वक्तव्य आहे केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांचे. त्यांच्या या विधानवरून नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात एका मागून एक गूढ मृत्यू होत असताना देशभर हा विषय चर्चिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सदानंद गौडा म्हणाले, काही विषय अत्यंत किरकोळ असतात. त्यावर पंतप्रधानांनी भाष्य करण्याची काहीच गरज नसते. गृहमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी त्याचबरोबर आमच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सविस्तरपणे बाजू मांडली आहे. प्रत्येक घटनेवर पंतप्रधानांनीच भाष्य केले पाहिजे, ही मागणी काही योग्य नाही, असे त्यांनी सांगितले. जर एखादा विषय देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असेल, तर त्याचवेळी पंतप्रधानांनी त्यावर बोलण्यासाठी आपण त्यांना विनंती करू शकतो. अशा छोट्या विषयामध्ये पंतप्रधानांनी बोलण्याची काही गरज नाही.