मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यातील दोषी व्यक्तींची गय करणार नाही, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. मात्र काँग्रेसने केलेली त्यांच्या राजीनाम्याची मागणी मात्र फेटाळली.
ते म्हणाले की, व्यापम घोटाळ्यात २०१३ मध्ये आपणच पहिल्यांदा प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले होते. यातील गुंतागुंत लक्षात घेऊन चौकशीसाठी विशेष पथक स्थापन केले व ते उच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष चौकशी पथकाच्या अंतर्गत काम करीत होते. दोन वर्षांपूर्वी विधानसभेत आपण हा घोटाळा झाल्याचे मान्य केले होते. व्यापममार्फत होणाऱ्या नेमणुकातील या घोटाळ्याची चौकशी चालू आहे. जो कुणी दोषी असेल त्याची गय केली जाणार नाही. जे कुणी कोठडीत आहेत त्यात काही राजकारणीही आहेत. कार्यकर्ते, नोकरशहा आहेत याचा अर्थ आम्ही काही लपवलेले नाही. उलट आम्ही पारदर्शक पद्धतीने चौकशी करीत आहोत पण आपण त्या प्रकरणात राजीनामा मात्र देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.