व्यावसायिक परीक्षा मंडळ(व्यापमं) घोटाळा प्रकरणाचे वृत्तांकन करणाऱया पत्रकाराच्या मृत्यू संदर्भात आक्षेपार्ह विधान करून मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी वाद ओढावून घेतला आहे. पत्रकाराचा विषय सोडून द्या, पत्रकार आमच्यापेक्षा मोठा आहे का?, असे तर्कट विधान करीत विजयवर्गीय यांनी या प्रकरणाची अक्षरश: खिल्ली उडवली आहे. व्यापमं घोटाळ्याचे वृत्तांकन करण्यास गेलेल्या अक्षय सिंग या प्रत्रकाराच्या संशयास्पद मृत्यूबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलत असताना विजयवर्गीय यांनी हे उद्दाम वक्तव्य केले. आधीच या घोटाळ्यामुळे मध्य प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठली असताना भाजपचे मंत्री असलेल्या विजयवर्गीय यांच्या वादग्रस्त विधानाने प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या घोटाळा प्रकरणात एकामागून एक मृत्यूचे सत्र सुरूच आहे. पत्रकार अक्षय सिंगच्या संशयास्पद मृत्यूनंतर रविवारी जबलपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण शर्मा यांचा मृतदेह दिल्लीतील एका हॉटेलात सापडला. तर, सोमवारी प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षक अनामिका सिकरवार यांचा मृतदेह एका तलावामध्ये आढळला आहे.