मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यात राज्य मंडळाच्या वतीने भरती करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह सापडला आहे. त्यांचा मृत्यूही संशयास्पद मानला जात आहे. काँग्रेसने याप्रकरणी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची हकालपट्टी करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. व्यापम घोटाळ्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या मृत्यूंमध्ये सोमवारी अनामिका सिकरवार (वय २५) यांची भर पडली असून त्यांचा मृतदेह सागर जिल्ह्य़ात पोलीस प्रशिक्षण अकादमीच्या शेजारी असलेल्या तळ्यात सापडला.
अनामिकाचा मृत्यू हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा संशय आहे. व्यापमतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत तिची उपनिरीक्षक पदी निवड झाली होती. पण पोलिसांच्या मते तिच्या निवडीचा व्यापमशी काही संबंध नाही व ती संशयित लाभार्थीही नव्हती.
यापूर्वी, पत्रकार अक्षय सिंह यांचा जबलपूर जिल्ह्य़ात झाबुआ येथे संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अरूण शर्मा यांचा मृत्यू वायव्य दिल्लीत द्वारका येथे एका हॉटेलमध्ये झाला.
‘सीबीआय तपासाबाबत न्यायालयाला निर्देश देऊ शकत नाही’
मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याबाबत विशेष तपास पथकाचा तपास मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू असून, हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश सरकार न्यायालयाला देऊ शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. मोठय़ा प्रमाणावरील भरती व प्रवेश घोटाळ्याचा सीबीआयमार्फत तपास करणे सरकार का टाळत आहे, असा प्रश्न विचारला असता असता सिंह म्हणाले की, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी या संदर्भातील एक जनहित याचिका याआधीच फेटाळून लावली आहे. त्यामुळे सुरू असलेला तपास या टप्प्यावर सीबीआयकडे सोपवण्यात काही हशील नाही. जर कुणी तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला किंवा तपासावर परिणाम करणारी काही घटना घडली, तर न्यायालय त्याची दखल घेईल, अशी आपल्याला खात्री असल्याचे सिंह म्हणाले. न्यायालयाने याबाबत काही निर्देश दिल्यास सरकार त्यांचे त्वरित पालन करील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी
शिवराज सिंह चौहान यांची हकालपट्टी करून व्यापम घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करावी. चौहान यांच्या कुटुंबाशिवाय त्यांच्या निकटच्या लोकांवरही गंभीर आरोप असल्याचे सांगून सीबीआय चौकशीची मागणी काँग्रेतकडून करण्यात आली आहे. व्यापम घोटाळ्यात आतापर्यंत ४५ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.