वॉलमार्टने लॉबिंगवर १२५ कोटी रूपये खर्च केले गेल्याच्या आरोपांवर बोलताना अमेरिकेने म्हटले आहे कि, वालमार्टने कोणत्याही अमेरिकी कायद्याचे उल्लंघन केलेले नाही.
भारतीय बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या लॉबिंगवर वॉलमार्टने १२५ कोटी रूपये खर्च केल्याचा आरोप काल (सोमवार) विरोधकांनी संसदेत केला होता. मात्र, अमेरिकेने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते विक्टोरिया नुलैंड यांनी भारतातील विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना धुडकावून लावत म्हटले आहे कि, ‘अमेरिकेच्या दृष्टीने आम्ही येथे कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले आहे असे आम्हाला वाटत नाही. याबाबतीतील अधिक माहितीसाठी तुम्ही भारताबरोबर चर्चा करावी’.
त्या पुढे म्हणाल्या कि, आम्ही या बातम्या पाहिल्या आहेत. अमेरिकेसंदर्भात लॉबिंगच्या मुद्याबाबत मला वाटते कि, तुम्हाला लॉबी डिस्क्लोजर अॅक्ट १९९५ आणि ऑनेस्ट लीडरशिप अॅण्ड ओपन गवर्नमेंट अॅक्ट २००७ बदद्ल माहिती असेल, ज्यामध्ये प्रत्येक कंपनीला एका अहवालामध्ये आपल्या लॉबिंग संबंधातील घडामोडींबद्दल माहिती द्यावी लागते.
नुलैंड पुढे म्हणाल्या, ‘या आरोपांमध्ये ज्या अहवालाचा दाखला देण्यात आला आहे त्यामध्ये अमेरिकेत वेळोवेळी मागवण्यात आलेला एक अहवाल आहे. तो आमच्या सरकारच्या पारदर्शी कारभाराचा एक भाग आहे. दरम्यान, वॉलमार्टने कोणत्याही चुकीच्या घडामोडींमध्ये गुंतले असल्याचा इन्कार केला आहे.
हे सर्व आरोप खोटे असल्याचे, कंपनीच्या एका प्रवक्त्याने स्पष्ट केले. अमेरिकेच्या कायद्यानुसार अमेरिकेतील कंपन्या लॉबिंगशी निगडीत प्रकरणांची आणि खर्चाची दर तीन महिन्याला माहिती देत असतात. यामध्ये लॉबिंगशी निगडीत कर्मचारी आणि वकिलांचा खर्चही समाविष्ट असतो.