भारतातील किराणा व्यापारक्षेत्रात शिरकाव करण्यासाठी सव्वाशे कोटी रुपये खर्च करणाऱ्या वॉलमार्टच्या लॉबिंग प्रकरणाचे तीव्र पडसाद संसदेत मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही उमटले. या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी केली. पण, वॉलमार्ट प्रकरणी देशाची प्रतिष्ठा पणाला लागली असून, त्याची न्यायालयीन किंवा संयुक्त संसदीय समितीद्वारे कालबद्ध चौकशी करून सत्य देशापुढे मांडले पाहिजे, अशी मागणी करीत विरोधकांनी गोंधळ घालून लोकसभेचे कामकाज बंद पाडले.
सभागृहाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी, सोनिया गांधी यांच्या इशाऱ्यावरून कमलनाथ यांना या प्रकरणी चौकशीची घोषणा करण्याचे निर्देश दिले. कमलनाथ यांनी तशी घोषणाही केली. पण या घोषणेमुळे विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यांनी सरकार आणि वॉलमार्ट निषेधाच्या घोषणा देत गोंधळ सुरुच ठेवल्याने अध्यक्ष मीराकुमार यांना लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यास भाग पडले.