फेसबुक वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी की, यापुढे त्यांना त्यांच्या प्रोफाइलमधील अडचणीची किंवा अश्लील भाषेत लिहिलेली तसेच आक्षेपार्ह पाने सहजगत्या काढून टाकता येणार आहेत. त्यासाठी एक नवीन उपयोजन म्हणजे अ‍ॅप तयार करण्यात आले असून त्याचे नाव ‘फेसवॉश’ असे आहे. तुमचा इंटरनेटवरचा फेसबुकवरील हा चेहरा जरा मळकट झाला असेल तर जरा फेसवॉश घेण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तुमचे फेसबुक अकाउंट पुन्हा समाजाच्या दृष्टीने लख्ख होईल.
केन्ट स्टेट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी ते तयार केले असून त्याच्या मदतीने फेसबुक वापरणाऱ्याच्या सर्व कृती शोधता येणार आहेत. त्याचबरोबर जी माहिती किंवा चित्रे त्याला लपवायची आहेत ती तो लपवू शकतो. यात स्टेट्स अपडेट्स, फोटो कॅप्शन व प्रतिक्रिया ज्या तुमच्या पानावर टाकण्यात आल्या आहेत किंवा ज्या लिंकस पाठवण्यात आल्या आहेत त्या लपवता येणार आहेत, असे लॉसएंजल्स टाइम्सने म्हटले आहे.
संशोधक डॅनियल ग्युर यांच्या यांनी सांगितले की, अनेक वेळा पुढे आपल्याला ज्या मालकाकडे नोकरी करायची आहे त्याच्या किंवा त्या कंपनीच्या मनुष्यबळ अधिकाऱ्यांच्या नजरेस येऊ नयेत अशी पाने किंवा नोंदी तुमच्या फेसबुकवर असतात व त्या नको असलेल्या नोंदी कशा काढून टाकायच्या असा प्रश्न पडतो त्यावर उपाय म्हणून हे उपयोजन तयार करण्यात आले आहे.
फेसवॉश हे उपयोजन ग्युर व त्याचे सहकारी मित्र कॅमडेन फुलमेर व डेव्हीड स्टेनबर्ग यांनी तयार केले असून त्यांनी पेनसिल्वानिया विद्यापीठात असताना दोन दिवसात ते तयार केले.
फेसबुक सध्या बिटा फेजमध्ये आहे त्यामुळे त्याचा वापर करताना तूर्त काही अडचणी येऊ शकतात, या उपयोजनाला वीस हजार वापरकर्त्यांनी भेट दिली आहे. पदवीही नसलेल्या विद्यार्थ्यांनी हे कल्पक उपयोजन तयार केले आहे, त्यात आणखी सुविधा देण्याचा विचार असल्याचे ग्युर यांनी सांगितले. सर्व भाषांतील आक्षेपार्ह व नको असलेला मजकूर वापरकर्त्यांच्या इच्छेनुसार साफ करण्याची क्षमता त्यात निर्माण करण्याचा त्यांचा इरादा आहे.

फेसवॉश वापरायचे कसे?
फेसवॉश वापरताना प्रथम फेसवॉशच्या संकेतस्थळावर जायचे तिथे गेट स्टार्टेडवर क्लिक करावे, नंतर फेसबुक अकाउंट उघडावे. नंतर वापरकर्त्यांने गो टू अ‍ॅप वर क्लिक करावे, त्यानंतर या उपयोजनाला म्हणजे फेसवॉशला वापरकर्त्यांचा कंटेट पाहण्याची परवानगी द्यावी. कुठलाही शब्द सर्चसाठी तो मजकूर किंवा चित्र शोधून काढले जाईल. जर फेसवॉशला त्याच्याशी जुळणारा मजकूर, चित्र सापडले तर तो ते दाखवेल व संबंधित पोस्ट दाखवेल मग तुम्ही ते काढून टाकू शकाल, आक्षेपार्ह चित्रही काढून टाकू शकाल.