उरी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध आक्रमक झाला असला तरी पाकविरूद्ध युद्ध छेडणार नाही. तसे केल्यास भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, असा इशारा पाकिस्तानी मुत्सद्यांकडून देण्यात आला आहे. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांकडून पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा केली जात आहे. या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून पाकिस्तानला एकटे पाडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीही घडत नसून उलट भारतच एकटा पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे मत पाकिस्तानच्या एका उच्चस्तरीय राजनैतिक अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. ‘डॉन’ या प्रख्यात पाकिस्तानी वृत्तपत्रामध्ये यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार नाही. पाकिस्तानचा तसा कोणताही इरादा नाही आणि आताच्या घडीला युद्ध झाल्यास  भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, याची जाणीव भारतासही आहेच,असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. नियंत्रण रेषेवर भारताकडून होत असलेल्या लष्करी हालचाली भारताचा संयम सुटत असल्याचा पुरावा आहे. हे भारत संवादाच्या मार्गापासून दूर जात असल्याचे द्योतक असून, ते सर्वांसाठी घातक आहे, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
उरी दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे १८ जवान आणि ३० जण जखमी झाले होते.यामध्ये महाराष्ट्रातील चारजणांचाही समावेश होता. शहीद झालेल्यांपैकी आठ जण प्रशासकीय विभागातील होते आणि त्यात सात स्वयंपाक्यांचा समावेश होता. श्रीनगरच्या उत्तरेकडे १०३ किलोमीटर अंतरावर वसलेल्या उरी शहराला रविवारी पहाटे जोरदार गोळीबाराच्या आवाजाने जाग आली होती. जैश-ए-मोहम्मदच्या ४ दहशतवाद्यांनी १० डोग्रा रेजिमेंटच्या बटालियन मुख्यालयात शिरून १८ जणांचे बळी घेतले होते. यानंतर चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.