क्योसेरा कंपनीची निर्मिती

आपल्याकडे असलेल्या मोबाईल किंवा स्मार्टफोनवर अनेक जीवाणू असतात, पण तो साफ करता येत नाही कारण स्मार्टफोन पाण्याने धुतला किंवा पाण्यात पडला तर निरूपयोगी होतो. मात्र, आता जपानी कंपनीने जगातील पहिला जलावरोधक स्मार्टफोन शोधून काढला असून तो साबण व पाण्याने धुता येतो. जपानमध्ये जलावरोधक स्मार्टफोन आधीच बाजारात होते; असे असले तरी जीवाणूपासून मुक्ततेसाठी तो साबणाच्या पाण्याने धुणे शक्य नव्हते, आताचा हा फोन रगडून धुतला तरी त्याला काही होणार नाही अशी उत्पादकांची हमी आहे. मोबाईल स्वच्छतेच्या या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी क्योसेरा या जपानी कंपनीने डिग्नो राफ्रे हा स्मार्टफोन तयार केला आहे, तो साबणाच्या पाण्यात टाकला तरी काही होत नाही. त्यामुळे तो घाण झाला तर धुता येतो, असे ‘द व्हर्ज डॉट कॉम’ या संकेतस्थळाने म्हटले आहे. क्योसेरा या जपानी इलेक्ट्रॉनिक्स व सेरॅमिक्स उत्पादकांच्या मते स्वयंपाकघरात, रूग्णालयात व अंघोळ करतानाही हा स्मार्टफोन वापरता येईल, त्याच्या स्पर्श पट्टिका या तो ओला झाला तरी काम करतात. क्योसेराच्या डिग्नो राफ्रे या फोनमध्ये स्मार्ट सॉनिक रिसीव्हर आहे, त्यामुळे ध्वनिवर्धकाशिवाय आवाज ऐकू येतो. राफ्रे हा अँड्राईड फोन असून त्याचा पडदा ५ इंचाचा व ७२० पिक्सेलचा आहे. कॅमेरा १३ मेगापिक्सेल असून जाडी १०.१ मि.मी आहे. त्याची बॅटरी तीन हजार अ‍ॅम्पियर तास क्षमतेची असून ती वीस तास चालते. जपानमध्ये पुढील आठवडय़ात हा फोन दाखल होत असून त्याची किंमत ५७४२० येन, ४६५ डॉलर म्हणजे ३१ हजार रूपये आहे.

’डिग्नो राफ्रे नावाचा हा फोन दणकट आहे.
’गरम पाण्यात टाकला तरी ४३ अंश सेल्सियस तापमान सहन करतो.
’पाण्यात टाकूनही तो खराब होत नाही कारण त्याला अतिशय घट्ट असे रबरी आवरण आहे.
’फोर जी सुविधा त्यात आहे. २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोरेज ही इतर वैशिष्टय़े आहेत.
’संसर्ग होऊ नये यासाठी रूग्णालयात वापरण्यास योग्य
’स्नानगृहातही ओल्या हातांनी तो पकडून बोलता येते.
किंमत- ३१ हजार रूपये