‘त्या’ बालगजराजांना वनराजांनी वेढा घातला. त्यांच्या अंगावर हल्ला करून त्यांना ओरबाडले, एक वनराज तर थेट त्यांच्या अंगावर उडी मारून बसले. दुसरा कोणताही प्राणी त्याजागी असता तर त्याने घाबरूनच धीर सोडला असता, पण त्या ‘चिमुकल्या’ हत्तीने झुंजायचे ठरवले आणि त्याने चक्क १४ सिंहांना पळवून लावले.
दक्षिण लुआंगवा राष्ट्रीय उद्यानात एका हत्तीच्या पिलाने १४ भुकेल्या सिंहांच्या टोळक्याशी धीराने दिलेल्या झुंजीची ही गोष्ट आहे. विशेष म्हणजे तेथे उपस्थित असलेल्या पर्यटकांनी त्याची व्हिडिओ काढून ती यूटय़ूब व अन्य संकेतस्थळांवर टाकली आहे. हत्तीचे हे पिलू कळपातून चुकून एकटे पडले होते. त्यामुळे सिंहाच्या या टोळक्याला आयती शिकार मिळाल्याचे वाटून तोंडाला पाणी सुटले पण हत्ती हा बुद्धिमान प्राणी असतो याची कल्पना त्या रानटी सिंहांना कशी असणार.. आता त्याला पकडून चट्टामट्टा करायचा असे चित्र त्यांनी मनात कदाचित ठरवून टाकले होते, त्यांनी या हत्तीच्या पाठीवर बसून त्याच्या पाठीत व पायात सुळे खुपसण्याचा प्रयत्न केला. या लहान हत्तीला या तीनचार आडदांड सिंहांना तोंड देणे सोपे नव्हते. ते त्याच्या छातीला बोचकारे काढत होते, हत्तीचे पिलू सुटकेचा मार्ग शोधत होते. या सगळ्या घटनेत बाजूला मोठी नदी होती. सगळे सिंह त्याच्या पाठंगुळीवर बसू पाहत होते. काही लचके तोडायला पाहत होते पण नंतर हत्ती नदीकडे वळला, तरीही ते त्याचा पिच्छा सोडेनात, त्या हत्तीने चक्क या सिंहांना पाठीवरून फेकायला सुरुवात केली. हत्तीच्या पिलाने १४ सिहांचा असा सामना केला. काही पर्यटक नॉर्मन कार सफारीसाठी चिनझोम्बो कॅम्पला जात होते, त्यांनी हे दृश्य टिपले. सफारी मार्गदर्शक असलेल्या व्यक्तीने सांगितले, की गेल्या अनेक वर्षांत आपण असे दृश्य बघितले नव्हते. सगळे पर्यटक हत्ती मरणार म्हणून चिंतेत होते पण लढवय्या हत्तीच्या पिलाने त्यांना पाण्यात गेल्यानंतर पिटाळून लावले. जेसी नॅश, डॅन ख्रिस्तोफेल, स्टीव्ह बेकर व निना क्रॅकोवस्की या पर्यटकांनी या छोटय़ा हत्तीला ‘हक्र्युलिस’ असे नावही देऊन टाकले. गेल्या महिन्यातही दोन काळ्या अस्वलांनी रस्त्यांवर धुमाकूळ घातला होता. नॅशनल जिऑग्राफिकच्या संकेतस्थळावर या घटनेची व्हिडिओ उपलब्ध आहे.