१५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे चौथं भाषण आहे. या भाषणात ते देशातील विविध समस्यांवर लक्ष केंद्रीत करतील अशी अपेक्षा आहे. तसंच आजवर मोदी सरकारनं केलेल्या विकासकामांवरही ते भाष्य करतील. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरक्षकांकडून होणाऱ्या हत्या आणि मारहाणीच्या घटनांबाबत काय बोलणार याचीही देश वाट पाहतो आहे.

‘वंदे मातरमची सक्ती’,  गोहत्या बंदी, असहिष्णूता, जीएसटी, गोरखपूर दुर्घटना या आणि अशा अनेक विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात भूमिका मांडण्याची शक्यता आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषणासंदर्भात लोकांकडून अनेक सूचना दिल्या जात असतात, त्यांनी काय बोलावं कोणते मुद्दे भाषणात आणावेत हे लोकांकडून सांगितलं जात असतं आणि त्याच आधारांवर हे भाषण दिलं जात असतं. याही वेळी अशा अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव नेमका कसा साजरा करतात, तसंच दिल्लीत त्यादिवशी नेमकं काय काय घडतं? याची माहिती लोकसत्ता ऑनलाईनच्या वाचकांसाठी आम्ही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत.

१) स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून किती वाजता देशाला उद्देशून भाषण करणार आहेत?

सकाळी ७.३५ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील अशी माहिती समोर आली आहे.

२) लाल किल्ल्यावर येण्यापूर्वी पंतप्रधान नवी दिल्लीत कोणकोणत्या स्थळांना भेट देतात?

सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी  राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींच्या समाधी स्थळाला पंतप्रधान आदरांजली वाहतील, त्यानंतर सकाळी ७.१५ मिनिटांच्या सुमारास त्यांचं लाल किल्ल्याजवळ आगमन होईल, सकाळी ७  वाजून २० मिनिटांनी तिन्ही सैन्यदलांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला जाईल. त्यानंतर सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी विरोधी पक्षातील नेत्यांचं आगमन होईल. सकाळी ७.३० मिनिटांनी झेंडावंदन आणि राष्ट्रगीत सादर होईल. राष्ट्रगीत सुरू असतानाच २१ तोफांची सलामी दिली जाईल, त्यानंतर सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पंतप्रधानांचं भाषण सुरू होईल.

३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण लाईव्ह कुठे ऐकायला मिळेल? लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे असेल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सगळ्या शासकीय चॅनल्सवर लाईव्ह असणार आहे. डीडी न्यूज, ऑल इंडिया रेडियोच्या सगळ्या वाहिन्या हे भाषण प्रसारित करणार आहेत. https://www.youtube.com/DoordarshanNational या डीडीच्या यूट्यूब चॅनलवर कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबुकपेजवर या भाषणाचं लाईव्ह स्ट्रीमिंग होईल.

४) पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी लाल किल्ल्यावर कोणकोण आमंत्रित असते?

१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी यावर्षी यूएईचे राजकुमार मोहम्मद बिन झायेद अल नौहान यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याशिवाय विरोधी पक्षातील सर्व नेते, पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, वायुदल, सैन्यदल आणि नौदलाचे प्रमुख यांची उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे. देशातील विविध शाळांमधील सुमारे ३५०० विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

५) नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे यंदा काय वेगळेपण असणार आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यावेळी होणारं भाषण हे कमी लांबीचं असणार आहे, थोडक्यात नरेंद्र मोदी अनेक विषयांना हात घालणार आहेत. मन की बात या आपल्या कार्यक्रमात त्यांनी स्वतःच आपण मोजकं आणि नेमकं बोलणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

६) पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर लाल किल्ल्यावरून केलेले नरेंद्र मोदी यांचे हे कितवे भाषण आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे लाल किल्ल्यावरून देण्यात येणारं हे चौथं भाषण असणार आहे.

७) नरेंद्र मोदी यांनी मागील तीन  वर्षांत लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाची काय वैशिष्ट्ये होती?

२०१६ मध्ये झालेल्या भाषणातील ठळक मुद्दे
देशाचा प्रवास हा स्वराज्याकडून सुराज्याकडे चालला आहे. देशातील जनतेला विकास दिसू लागला आहे म्हणून ते आमच्या सरकारकडून अपेक्षा ठेवत आहेत. पुढील १ हजार दिवसात आम्ही १८ हजार गावांमध्ये वीज पोहचवणार आहोत. महागाईचा दर आधीच्या सरकारच्या काळात १० टक्क्यांपर्यंत पोहचला होता आम्ही तो ६ टक्क्यांच्या वर जाऊ दिला नाही.

आमच्या सरकारची ओळख निर्माण करण्यापेक्षा देशाची ओळख सगळ्या जगात कशी निर्माण होईल यादृष्टीनं आम्ही पावलं टाकतो आहोत. मागील दोन वर्षात आमच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही आणि म्हणूनच देशाच्या आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पुढील दोन वर्षात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर येईल. वस्तू आणि सेवाकर यामुळे करप्रणालीत समानता येणार आहे. एक समाज, एक दिशा, एक संकल्प, एक लक्ष्य या दृष्टीनं आपण वाटचाल करू
२०१५ मध्ये झालेल्या भाषणातील ठळक मुद्दे
१५ ऑगस्टची ही सकाळ ही देशातील जनतेच्या स्वप्नपूर्तीची सकाळ आहे, ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं त्या शहिद स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नांमधील भारत आपल्याला यापुढे घडवायचा आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा सहभाग असतो तो जनतेचा, जनतेला सोबत घेऊनच सरकारला विकासाच्या दृष्टीनं पुढील वाटचाल करायची आहे. मागील ६० वर्षांपासून देशातील ४० टक्के गरीब जनता बँक खात्यांपासून वंचित होती. मात्र आता ही परिस्थिती उरलेली नाही. गरीबांसाठी आम्ही जन-धन योजना आणली. १७ कोटी लोकांनी पंतप्रधान जन-धन योजने अंतर्गत बँकेत खाती उघडली आहेत.

पंतप्रधान वीमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना,  जीवन ज्योती योजना यांसारख्या योजनांशी अनेक नागरिक जोडले गेले आहेत ज्याचा त्यांना निश्चितच लाभ होणार आहे. २०१९ मध्ये आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करणार आहोत, या वर्षात आपल्याला संपूर्ण भारत स्वच्छ करायचा आहे त्यासाठीच्या अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे.काळा पैसा भारतात आणण्यासाठी आम्ही आवश्यक ती पावलं उचलली आहेत. भ्रष्टाचार करणाऱ्या १८०० भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आम्ही कारवाई सुरू केली आहे. येत्या काळात आपला देश आपल्या डिजिटल करायचा आहे.
२०१४ मध्ये झालेल्या भाषणातील ठळक मुद्दे
आपला देश १९४७ मध्ये स्वतंत्र झाला, पण ज्यांनी या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे का? आजही आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं आहे का? आपण आपल्याच मानसिक गुलामीच्या पारंतत्र्यात अडकून गेलो आहोत हे सत्य नाही का? आजही आपले मागसलेले विचार आपल्या प्रगतीतले मोठे अडसर आहेत. गरीबांच्या थाळीत अन्न असायला हवं त्याऐवजी आत्तापर्यंतचं सरकार गरीबांच्या जखमांवर मीठच चोळत आलं आहे.

आज महागाईच्या समुद्रात विकास बुडतो आहे, ही परिस्थिती भीषण आहे. गरीब जनतेला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. सामान्य माणूस त्याच्या हक्कांपासून वंचित आहेत ते त्याला मिळवून देणं गरीबांना न्याय मिळवून देणं त्यांच्या अन्न-वस्त्र निवारा या गरजा भागवणं हे सरकारपुढचं प्रमुख आव्हान आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हे आमच्या सरकारचं प्रमुख ध्येय आहे आपण सगळे मिळून त्या दिशेनं वाटचाल करूया!