यंदाच्या वर्षात एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक विक्रम प्रस्थापित केले. या चित्रपटाच्या यशाचे मुख्य कारण ठरले होते ते त्यामधील व्हीएफएक्स इफेक्टस. चित्रपटातील बहुतांश दृश्यांसाठी व्हीएफएक्सची मदत घेण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षक ‘बाहुबली’ बघताना चांगलेच थक्क झाले होते. मात्र, हे व्हीएफएक्स इफेक्टस देताना पडद्यामागची प्रक्रिया नेमकी कशी होती, हे पाहिल्यानंतर प्रेक्षक आणखीनच थक्क होतील. हैदराबादच्या मकुता व्हीएफएक्सने इंटरनेटवर नुकताच ‘बाहुबली’मधील व्हीएफएक्स इफेक्टस देण्याची प्रक्रिया उलगडणारा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. ‘बाहुबली’मधील अनेक दृश्यांमागची व्हीएफएक्सची प्रक्रिया किती क्लिष्ट आणि अवघड होती, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते. काल्पनिक गोष्टी, आजुबाजुचा निसर्ग आणि अनेक बारीक बारीक तुकड्यांनी तयार होणारे दृश्य पाहतानाचा प्रवास खरचं थक्क करणारा आहे. ‘बाहुबली’मधील महिष्मतीचा भव्य दरबार आणि अवंतिकाचे नृत्य ही दृश्ये तर केवळ आणि केवळ तंत्रज्ञानाची कमाल असल्याचे या व्हिडिओत दिसते.