वैज्ञानिकांचा दावा, संशोधकांच्या पथकात भारतीय वंशाचे मूर्ती गुडीपथी यांचा समावेश
अवकाश संशोधनाच्या इतिहासात सर्वात जास्त अभ्यास झालेला धूमकेतू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ६७ पी चुरयुमोव- गेरासिमेन्को या धूमकेतूवर बर्फाच्या स्वरूपातील पाणी असल्याचे दिसून आले असून या संशोधनात एका भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचाही समावेश आहे.
युरोपीयन अवकाश संस्थेच्या रोसेटा यानाच्या मदतीने गोळा केलेल्या माहितीत बर्फाचे हे थर दिसले असून ते डम्बेल्सच्या आकाराच्या या धूमकेतूच्या खालच्या इमहोटेप या भागात दिसले आहेत. दृश्य प्रकाशात या धूमकेतूवरील बर्फाचे पांढरे पट्टे स्पष्ट दिसत आहेत.
धूमकेतूवरील कडय़ासारखा भाग व ढिगाऱ्यात या बर्फाचा समावेश आहे. कॅलिफोर्निया येथील जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी या संस्थेने हे संशोधन केले असून त्यात भारतीय वंशाचे मूर्ती गुडीपथी यांचा समावेश आहे. ६७ पी चुरयुमोव- गेरासिमेन्को या धूमकेतूचा पृष्ठभाग हा गडद असून तो जवळपास काळा आहे. कारण धूमकेतू सूर्याच्या दिशेने जात असतात तेव्हा त्यांना जास्त तापमानाचा सामना करावा लागत असतो व तेव्हा या धूमकेतूंचे घन रूपातून वायू रूपात रूपांतर होते असे लॉसएंजल्स टाइम्स या वृत्तपत्राने म्हटले आहे. धूमकेतूत दगड, वाळू व राख यांचा समावेश होतो असे वैज्ञानिकांचे मत आहे. रोसेटाच्या दृश्य अवरक्त व औष्णिक वर्णपंक्तिमापकाने असे दाखवून दिले की, इमोहोटेप भागात बर्फाचे थर दिसले असून ते वेगळ्या आकाराचे आहेत. यात बर्फाचे काही खडे मायक्रोमीटरच्या दशांश आकाराचे असून धूमकेतूच्या १२ तासांच्या प्रदक्षिणेत ते दिसून येतात. जेव्हा धूमकेतू सूर्यापासून दूर जातो तेव्हा तापमान कमी होते व पाण्याच्या थेंबांचे बर्फात रूपांतर होऊ लागत. त्याच्या डोके व मध्य भागात बर्फाचा पातळ थर तयार होतो. धूमकेतूच्या पृष्ठभागावर दिवसा तापमान वाढून पाण्याचे बाष्प होते.
व्हिरिटिस म्हणजे रोसेटा यानाच्या दृश्य अवरक्त व औष्णिक वर्णपंक्तिमापकाने धूमकेतूच्या काही भागात बर्फाचे कण असल्याचे दाखवून दिले आहे. नेचर या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.