पाकिस्तानी झेंडे फडकावणे हा फौजदारी गुन्हा होत नसल्याचा दावा जहालवादी हुर्रियत कॉन्फरन्सने रविवारी केला. असे झेंडे फडकावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, हे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे वक्तव्य म्हणजे ‘निव्वळ वैफल्य’ असल्याचे वर्णन त्यांनी केले.
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने १९८३ साली दिलेल्या निर्णयानुसार, पाकिस्तानी झेंडा फडकावणे हे कृत्य कुठल्याही फौजदारी गुन्ह्य़ाच्या कक्षेत येत नाही. झेंडा फडकावण्याला कुठल्याही देशाविरुद्ध युद्ध पुकारणे म्हटले जाऊ शकत नाही, असे हुर्रियतचे प्रवक्ते अयाझ अकबर यांनी एका निवेदनात सांगितले.
आम्ही हे स्पष्ट करतो, की आम्ही फक्त आमच्या आघाडीचे झेंडे फडकावतो, परंतु काही उत्साही युवक पाकिस्तानचे झेंडेही फडकावतात आणि त्यात काहीच नवीन नाही, असे काही दिवसांपूर्वी हुर्रियतचे प्रमुख सय्यद अली शाह गिलानी यांच्या जाहीर सभेत झालेल्या प्रकाराच्या संदर्भात अकबर म्हणाले, ‘चंद्र व तारा’ हे पाकिस्तानचा झेंडा व हुर्रियतचा झेंडा यात समानता असून, हे चिन्ह पूर्वीपासून इस्लामशी जोडले गेल्यामुळे हा ‘निव्वळ योगायोग’ असल्याचेही त्यांनी सांगितले.
असे प्रकार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, हे विधान मुख्यमंत्र्यांनी केवळ वैफल्यातून केले आहे. पाकिस्तानी झेंडे फडकावण्यात काहीच नवीन नसल्याचे त्यांना माहीत आहे. जेव्हा-जेव्हा पाकिस्तानचा क्रिकेट संघ जिंकतो, त्या वेळी काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकावले जातात व फटाके फोडण्यात येतात, असेही अकबर यांनी नमूद केले.